आयपीएल २०२२मध्ये शुक्रवारी (२९ एप्रिल) लखनऊ सुपरजायंट्सने पंजाब किंग्जला २० धावांनी पराभूत केले. लखनऊने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्स गमावत १५३ धावा केल्या. मात्र पंजाबचा संघ लखनऊच्या १५४ धावांच्या आव्हानाचाही पाठलाग करू शकला नाही. २० षटकांमध्ये ८ विकेट्स गमावत पंजाबला केवळ १३३ धावाच करता आल्या. मात्र लखनऊच्या विजयानंतरही कर्णधार केएल राहुल याने संघाच्या फलंदाजी प्रदर्शनाबद्दल निराशा व्यक्त केली आहे. त्याने संघाच्या विजयाचे संपूर्ण श्रेय गोलंदाजांना दिले आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊकडून (LSG vs PBKS) एकाही फलंदाजाला साधे अर्धशतकही करता आले नाही. या डावात लखनऊकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ४६ धावा केल्या. आपल्या फलंदाजांच्या प्रदर्शनाबाबत (Poor Batting Performance) निराशा व्यक्त करताना राहुल (KL Raul) म्हणाला की, “आम्ही आमच्या फलंदाजांच्या प्रदर्शनावर खुश नाहीत. आमच्या फलंदाजी फळीत अनुभवाचा भरणा आहे आणि आम्ही याचा फायदा घ्यायला पाहिजे होता. परंतु खेळपट्टी फलंदाजीसाठी अवघड होती. तरीही आम्ही १६०पेक्षा जास्त धावा करणे अपेक्षित होते.”
या सामन्यात वेगवान गोलंदाजांचा खेळपट्टीकडून अधिकचा बाऊन्स मिळत होता, ज्याचा लखनऊच्या गोलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला आणि पंजाबला १३३ धावांवरच रोखले.
गोलंदाजांच्या प्रदर्शनाचे कौतुक करताना (KL Rahul Praises Bowlers) राहुल म्हणााला की, “भलेही आमच्या फलंदाजांनी निराशा केली. पण गोलंदाजांनी खूप चांगले प्रदर्शन केले. कृणाल पंड्याने या संपूर्ण आयपीएल हंगामात दमदार प्रदर्शन केले आहे. त्याने महत्त्वाच्या क्षणी संघाला विकेट्स मिळवून दिल्या. याशिवाय वेगवान गोलंदाजांनीही ज्या प्रकारे गोलंदाजी केली, त्याचा संघाला फायदा झाला आहे. आम्हाला कोणत्याही सामन्यात परिस्थितीला चांगल्याप्रकारे समजून घेण्याची गरज आहे. आम्हाला माहिती पाहिजे की, आम्हाला कधी काय करायचे आहे.”
लखनऊने अशी मारली सामन्यात बाजी
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, लखनऊने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १५३ धावा केल्या. यामध्ये डी कॉकच्या ४६ धावांच्या खेळीबरोबरच दीपक हुड्डाच्या ३४ धावा आणि दुष्मंथा चमीराच्या १७ व मोहसीन खानच्या नाबाद १३ धावांचा समावेश होता. या डावात पंजाबकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात पंजाबकडून जॉनी बेयरस्टोने सर्वाधिक ३२ धावा केल्या. तसेच कर्णधार मयंक अगरवालने २५ धावा आणि रिशी धवनने नाबाद २१ धावा केल्या. या डावात लखनऊकडून मोहसिन खानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच दुष्मंथा चमीरा आणि कृणाल पंड्या यांनीही प्रत्येकी २ विकेट्सचे योगदान दिले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-