दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुरुवारी (०७ एप्रिल) खेळला गेलेला आयपीएल २०२२ चा पंधरावा सामना लखनऊ सुपरजायंट्सने ६ विकेट्स राखून जिंकला. हा लखनऊचा हंगामातील सलग तिसरा विजय होता. तर दिल्लीचा सलग दुसरा पराभव होता. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाज एन्रिच नॉर्किया याचा हा हंगामातील पहिलाच सामना होता. मात्र या सामन्यात त्याने मोठी चूक केली, ज्याची शिक्षा त्याला पंचांकडून मिळाली व तो पुन्हा गोलंदाजी करू शकला नाही.
या सामन्यात (DC vs LSG) प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने पृथ्वी शॉच्या अर्धशतकाच्या जोरावर ३ बाद १४९ धावा केल्या होत्या. दिल्लीच्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊकडून क्विंटन डी कॉकने (Quinton De Kock) शानदार ८० धावांची खेळी केली. त्याने ५२ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ही खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने नॉर्कियाला (Anrich Nortje) चांगलाच चोप दिला.
नॉर्कियाच्या पहिल्या षटकात डी कॉकने सलग ३ चौकार मारले आणि १ षटकार ठोकला. अशाप्रकारे डी कॉकने त्याच्या पहिल्या षटकात १९ धावा केल्या. त्यानंतर चौदाव्या षटकात पुन्हा डी कॉकने पुन्हा १४ धावा केल्या. याच षटकादरम्यान त्याने १ नो बॉल टाकला. त्यानंतर पुन्हा सोळाव्या षटकातही त्याने अजून एक नो बॉल टाकला. अशाप्रकारे २ नो बॉल (Anrich Nortje 2 No Balls) टाकल्यामुळे पंचांनी त्याला गोलंदाजी करू दिली नाही. त्याचे हे षटक कुलदीप यादवने पूर्ण केले. त्यामुळे नॉर्कियाने सामन्यात केवळ २.२ षटके गोलंदाजी केली.
शेवटच्या षटकात लखनऊने जिंकला सामना
दिल्लीविरुद्ध लखनऊने शेवटच्या षटकात रोमांचक विजय मिळवला. दिल्लीच्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात लखनऊला ५ धावांची गरज होती. या षटकातील पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरने दीपक हुडाला बाद केले. मात्र युवा आयुष बदोनी याने तिसऱ्या चेंडूवर चौकार व चौथ्या चेंडूवर षटकार मारत लखनऊला सामना जिंकून दिला.
लखनऊचा विजयरथ सुस्साट
लखनऊने आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात पराभवासह केली होती. गुजरात टायटन्सने त्यांना ५ विकेट्स राखून पराभूत केले होते. मात्र या पराभवानंतर लखनऊने जोरदार पुनरागमन केले. त्यांनी दुसऱ्या सामन्यात अनुभवी चेन्नई सुपर किंग्जला ६ विकेट्सने धूळ चारली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादला १२ धावांनी पराभूत करत दुसरा विजय नोंदवला व आता दिल्लीला चितपट करत विजयाची हॅट्रिक केली आहे. या पराक्रमासह लखनऊ संघ सध्या ६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कॅप्टन राहुल सलग तिसऱ्या विजयानंतर म्हणतोय, लखनऊ संघाला ‘ही’ गोष्ट सुधारण्याची गरज
टी२०त १० हजार धावा करणाऱ्या फलंदाजाची युवा बिश्नोईपुढे शरणागती, ६ चेंडूत ३ वेळा दिलीय विकेट
IPL2022| पंजाब वि. गुजरात सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!