---Advertisement---

LSG vs RCB: आज कोण मारणार बाजी? विराट कोहली-रिषभ पंत आमनेसामने

On: गुरूवार, मे 7, 2026 4:43 PM
---Advertisement---

लखनऊ सुपर जायंट्ससाठी आजचा सामना ‘करो या मरो’ असा असणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली असून प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची वेळ आता जवळ आली आहे. आजचा सामना गमावल्यास एलएसजीच्या प्लेऑफच्या आशांवर अधिकृतपणे पाणी फिरणार आहे. मात्र विजय मिळाल्यास त्यांची थोडीफार आशा कायम राहू शकते. आज एकाना स्टेडियमवर एलएसजी आणि आरसीबी यांच्यात रंगतदार लढत होणार आहे.

आज संध्याकाळी 7.30 वाजता लखनऊच्या एकाना स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून टॉस 7 वाजता होईल. एलएसजीने आतापर्यंत 9 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. संघ केवळ 4 गुणांसह गुणतालिकेत तळाशी आहे. सलग पराभवांमुळे संघाचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे.

दुसरीकडे आरसीबीचा संघ दमदार फॉर्ममध्ये आहे. सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेली आरसीबी आजचा सामना जिंकली तर थेट अव्वल स्थानावर पोहोचू शकते. त्यामुळे प्लेऑफच्या दिशेने त्यांची वाट आणखी सोपी होईल. एलएसजी आणि आरसीबी यांच्यात आतापर्यंत 7 सामने झाले असून त्यापैकी 5 सामने आरसीबीने जिंकले आहेत. याच हंगामात 15 एप्रिलला झालेल्या सामन्यातही आरसीबीने 5 विकेट्सने विजय मिळवला होता.

आरसीबीकडे विराट कोहलीसारखा अनुभवी फलंदाज आहे. फिल सॉल्ट दुखापतीमुळे बाहेर गेला असला तरी त्याच्या जागी आलेल्या जेकब बेथेलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. रजत पाटीदार मधल्या फळीत शानदार फलंदाजी करत आहे, तर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांची गोलंदाजी संघासाठी मोठी ताकद ठरत आहे.

एलएसजीकडे मोठी नावं असली तरी खेळाडूंकडून अपेक्षित कामगिरी होत नाहीये. निकोलस पूरनने मागील सामन्यात आक्रमक खेळी केली होती, पण संघाला विजय मिळवून देता आला नाही. कर्णधार रिषभ पंतही धावांसाठी संघर्ष करत असून त्याच्यावर दबाव वाढताना दिसत आहे.

आजच्या सामन्यात आरसीबीचे पारडे जड मानले जात आहे. मात्र स्पर्धेबाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर असलेली एलएसजी जोरदार पुनरागमन करून आरसीबीला धक्का देऊ शकते. एकानाची खेळपट्टी फार धावांची नसल्याने पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने 180 धावा केल्या तरी तो चांगला स्कोअर ठरू शकतो. दरम्यान, या सामन्यात हलक्या पावसाची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---