इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामासाठी मेगा लिलाव येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. लिलावापूर्वी खेळाडूंना रिटेन करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. सर्व संघांना गुरूवारी (31 ऑक्टोबर) सायंकाळपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागेल.
दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलनं संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एलएसजी राहुलला रिटेन करणार नाही, असा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये केला जात होता. आता राहुलनं स्वतः संघ सोडल्याच्या वृत्तानं अनेकांना धक्का बसला आहे.
केएल राहुलनं वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांमुळे लखनऊची साथ सोडल्याचा दावा ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात करण्यात आला आहे. याच रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, काही मोठ्या संघांनी राहुलला लिलावात खरेदी करण्यात रस दाखवला. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांचा समावेश आहे.
यापैकी आरसीबी राहुलसाठी सर्वाधिक प्रयत्न करू शकते. याची अनेक कारणं आहेत. सध्या आरसीबीही नवीन कर्णधाराच्या शोधात असून राहुलकडे नेतृत्वाचा चांगला अनुभव आहे. दुसरं म्हणजे, राहुल कर्नाटकचा आहे. तो यापूर्वी आरसीबीकडून खेळला आहे. त्यामुळे तो चाहत्यांच्या पसंतीचा खेळाडू आहे.
दुसरीकडे, भारताचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड राजस्थान रॉयल्समध्ये प्रशिक्षक म्हणून परतले आहेत. ते केएल राहुलचे प्रशंसक आहेत. त्यामुळे ते राहुलला आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं बोललं जातंय. केएल राहुलला घेण्यासाठी आणखी एका संघानं रस दाखवला आहे. हा संघ म्हणजे पाच वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज. महेंद्रसिंह धोनी सध्या त्याच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत संघाला एका अनुभवी यष्टीरक्षकाची आवश्यकता आहे जो धोनीप्रमाणे आक्रमक फलंदाजी देखील करतो. केएल राहुल ही भूमिका योग्यपणे निभावू शकतो. त्यामुळे त्याच्या सीएसकेमध्ये जाण्याच्या देखील शक्यता आहेत.
हेही वाचा –
बुमराहचं अव्वल स्थान गेलं, रोहित-विराटचीही मोठी घसरण! ताजी कसोटी क्रमवारी जाणून घ्या
चेन्नई सुपर किंग्जनं जाहीर केली रिटेन होणाऱ्या खेळाडूंची यादी! या 5 जणांना ठेवणार कायम?
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये विचारला 6 लाख रुपयांचा क्रिकेटचा प्रश्न! तुम्हाला उत्तर माहित आहे का?