---Advertisement---

बीसीसीआयची भीतीच राहिली नाही! LSG चा स्टाफ CSK विरुद्धच्या सामन्यावेळी मोबाईल वापरताना आढळला? नव्या वादाला सुरूवात

On: सोमवार, मे 11, 2026 5:02 PM
---Advertisement---

राजस्थान रॉयल्सनंतर आता लखनऊ सुपर जायंट्सचा संघ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यांच्या डगआऊटमध्ये एक बॅकरुम स्टाफ सदस्याने मोबाईल फोन वापरत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. रविवारी (१० मे) चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स भिडले. या सामन्यावेळी कॅमेरा एलएसजीच्या कॅम्पकडे वळाला असता एका दृश्यात एक कर्मचारी कथितरित्या फोनवर बोलताना दिसला.

आयपीएलच्या प्लेयर एंड मॅच ऑफिशियल एरिना (POMA) नियमांनुसार, संघ व्यवस्थापकांना मोबाईल फोन वापरण्याची परवानगी आहे, मात्र ते केवळ ड्रेसिंग रुमपुरते मर्यादित असून डगआऊटमध्ये नाही. संघातील काही सदस्य वगळता या क्षेत्रात मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यास परवानगी नाही.

ऍनालिस्ट लॅपटॉप वापरू शकतात. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांनी मैदानात आल्यावर त्यांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे टीम एसएलओ (SLO) यांच्याकडे बंद करुन जमा करावीत. मान्यताप्राप्त कर्मचारी, म्हणजेच ड्रेसिंग रुम अटेंडट, आयपीएल मॅच मॅनेजर, केटरिंग स्टाफ हे पण पीएमओएमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाऊ शकत नाही, हे सर्व बीसीसीआयच्या नियमावलीत सांगितले आहे.

एलएसजीच्या त्या कर्मचाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तो व्यक्ती नेमका कोण होता, हे मात्र कळाले नाही. संघाने किंवा बीसीसीआयने अद्याप याचे स्पष्टीकरण दिलेले नाही, मात्र तो व्यक्ती व्हीआयपी स्टॅंडमध्ये बसलेला असल्याचे कळते. यावरून नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे.

अशाप्रकारची घटना याआधी १० एप्रिलला गुवाहाटीमध्ये झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यावेळी घडली होती. तेव्हा आरआरचे संघ व्यवस्थापक रोमी भिंदर यांना डगआऊटमध्ये मोबाईलचा वापर केल्याने १ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच त्यांना बीसीसीआयने अधिकृत ताकिदही दिली होती.

सामन्याचे पाहिले तर एलएसजीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ विकेट्स गमावत २०३ धावा केल्या होत्या. त्यांचा सलामीवीर जोश इंग्लिसने सर्वाधिक ८५ (३३) धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसकेने चांगली सुरूवात केली. उर्विल पटेलने १३ चेंडूत अर्धशतकी खेळी करत संघाच्या डावाला वेग दिला. तो २३ चेंडूंत ६५ धावा करत बाद झाला. तो पर्यंत संघाने विजय निश्चित केला होता. हा सामना सीएसकेने ५ विकेट्सने जिंकला.

एलएसजी या हंगामाच्या प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर झाला असून सीएसके गुणतालिकेत १२ गुणांसह पाचव्या स्थानी आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---