---Advertisement---

VIDEO: भुवीचा 10 वर्षांमधील पहिला आयपीएल षटकार, ज्याने पाच वेळेचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स झाला बाहेर

On: सोमवार, मे 11, 2026 12:37 PM
---Advertisement---

गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी (१० मे) आयपीएल २०२६ मधून मुंबई इंडियन्सला बाहेर केले आहे. रायपूरमध्ये हे दोन्ही संघ भिडले, या रोमांचक सामन्यात आरसीबीने २ विकेट्सने विजय मिळवला आणि विजयाचा नायक ठरला भुवनेश्वर कुमार.

आपल्या अनुभवी गोलंदाजीने प्रथम फलंदाजांना रोखले नंतर लक्ष्याचा पाठलाग करताना तणावपूर्ण अंतिम षटकामध्ये निर्णायक षटकार मारत संघाला विजय मिळवून देणारा भुवनेश्वर सामनावीर ठरला.

या सामन्यात आरसीबीला विजयासाठी शेवटच्या ३ चेंडूंत ९ धावांची आवश्यकता होती, भुवनेश्वरने राज अंगद बावाच्या गोलंदाजीवर षटकार मारला आणि सामना आरसीबीच्या बाजूने झुकवला. हा एक दुर्मिळ क्षण ठरला, कारण त्याने आयपीएलमध्ये शेवटचा षटकार २०१६ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध मारला होता.

सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर भुवनेश्वरने मान्य केली की त्याच्यासाठी विकेट्सपेक्षा हा षटकार अधिक महत्वाचा होता, असे वक्तव्य केले. त्याला समालोचक हर्षा भोगलेंनी विचारले की षटकार की विकेट्स महत्वाचे? तो म्हणाला, “नक्कीच षटकार महत्वाचा, कारण मी अनेकदा गोलंदाजी केली आहे. मी याआधी काही विकेट्सही घेतल्या आहेत, मात्र षटकार मारल्याचा आनंद सर्वाधिक झाला.”

वयाच्या ३६ व्या वर्षीची कामगिरीत सातत्य राखल्याबद्दल भुवनेश्वर म्हणाला, “खरं सांगायचं तर ‘मोटिव्हेशन’ हा शब्द माझ्यासाठी खूप ओव्हररेटेड आहे. ते लवकर संपतं. शिस्तच मला सतत पुढे नेत असते. फिट राहण्यासाठी माझे फिजिओ मला खूप मदत करतात.”

या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. त्यामध्ये भुवनेश्वरने संघाल चांगली सुरूवात करून दिली. त्याने रायन रिकल्टन, रोहित शर्मा, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना बाद करत एमआयची फलंदाजी फळी उद्ध्वस्त केली. नमन धीरच्या ४७ धावा आणि तिलकच्या ५७ धावांमुळे एमआयने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १६६ धावा केल्या. भुवनेश्वरने ४ षटकांत २३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याला बाकी गोलंदाजांनीही चांगली साथ दिली.

जोश हेझलवूड, रसिक सलाम दार आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. कृणाल पांड्याने विकेट घेतली नसली तरी त्याने ३ षटकांत २६ धावा दिल्या. नंतर त्याने लक्ष्याचा पाठलाग करताना महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्याने ४६ चेंडूंमध्ये ७३ धावा केल्या आणि आरसीबीसाठी विजय निश्चित केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---