आयपीएल २०२२ (IPL 2022) चा मेगा लिलाव जवळ येत आहे. हा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे पार पडणार असून एकूण १० संघांत खेळाडूंवर बोली लावताना चूरस पाहायला मिळणार आहे. यंदा अहमदाबाद आणि लखनऊ या दोन संघांचा नव्याने समावेश झाला आहे.
दरम्यान या लिलावात ५९० खेळाडू सहभागी होणार असून त्यांच्यामध्ये २२८ कॅप्ड (आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले), ३५५ अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले) आणि ७ सहयोगी देशांचे खेळाडू असणार आहेत. मेगा लिलावात सर्वच फ्रॅंचायझी आपला संघ मजबूत करण्यासाठी दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर बोली लावू शकतात.
लखनऊ फ्रॅंचायझीने आपल्या संघाचे नाव लखनऊ सुपरजायंट्स असे ठेवले आहे. त्यांनी केएल राहुलला संघाचा कर्णधार केले आहे, तर रवी बिश्नोई आणि मार्क स्टाॅयनिस यांना विकत घेतले आहे. त्यामुळे ही फ्रॅंचायझी उत्तर प्रदेशच्या स्थानिक खेळाडूंना संघात सामाविष्ट करु शकते, कारण त्यांना घरच्या मैदानात सामने होण्याचा फायदा होऊ शकतो आणि चाहत्यांची सुद्धा त्यांना साथ मिळेल. उत्तरप्रदेशात अनेक स्टार खेळाडू आहेत, ज्यांनी मेगा लिलावात सहभाग घेतला आहे. या लेखात आपण अशा खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात जे उत्तरप्रदेशचे असून त्यांच्यावर लखनऊ सुपरजायंट्स बोली लावू शकतो.
१) कुलदीप यादव (KULDEEP YADAV)
उत्तर प्रदेशचा गोलंदाज आणि भारतासाठी ९५ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला कुलदीप यादव गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. गेल्या काही हंगामात त्यांची कामगिरी तितकी चांगली नसली तरी, तरी लखनऊ सुपरजायंट्स कुलदीपवर पैसे लावू शकतो.
आयपीएलमध्ये त्याने ४५ सामन्यांमध्ये ३०.९ च्या सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत. यात सर्वोत्तम कामगिरी त्याने २० धावा देऊन ४ विकेट घेण्याची केली आहे. हा गोलंदाज स्थानिक खेळाडू म्हणून संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, त्यामुळे फ्रँचायझी त्याला संघात घेण्याचा विचार करू शकते.
२) सुरेश रैना (SURESH RAINA)
भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाचाही यावेळी लिलावात समावेश आहे. हा फलंदाज आयपीएलचा यशस्वी खेळाडू ठरला आहे, पण गेल्या काही हंगामात त्याने काही विशेष कामगिरी केली नाही. तो उत्तर प्रदेशचा असल्याने लखनऊ संघात रैनाचा समावेश केला जाऊ शकतो आणि या काळात तो संघातील तरुणांना चांगला मार्गदर्शन देऊ शकतो. तसेच फॉर्ममध्ये आला, तर संघाला आणखी फायदा होऊ शकतो. तो आतापर्यंत आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे.
३) भुवनेश्वर कुमार(BHUVANESHWAR KUMAR)
उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने भारतासाठी आतापर्यंत १९७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच त्याने विविध संघांकडून एकूण १३२ आयपीएल सामनेही खेळले आहेत. भुनेश्वरने आयपीएलमध्ये २५.२७ च्या सरासरीने १४२ विकेट घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी १९ धावा देत ५ विकेट घेतलेली आहे. भुवी पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये उत्तम गोलंदाज आहे. लखनऊ संघ त्याच्यावर पैसा खर्च करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
केएल राहुल झुकेगा नहीं…! लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार ‘पुष्पा’च्या लूकमध्ये दिसतोय ‘फायर’
भारतात विराटचा मोठा विश्वविक्रम; मास्टर-ब्लास्टर सचिनही पडला जवळपास ८०० धावांनी मागे