शनिवारी (दि. ०७ मे) आयपीएल २०२२मधील ५३वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात लखनऊ संघाने ७५ धावांनी विजय मिळवला. हा लखनऊ संघाचा ८वा विजय होता. या विजयात फलंदाज आणि गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. त्यातल्या त्यात जेसन होल्डर आणि आवेश खान यांच्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. आवेश खानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १७६ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दोन वेळचा आयपीएल विजेता असलेल्या कोलकाता संघाला सर्वबाद फक्त १०१ धावाच करता आल्या. त्यामुळे लखनऊने हा सामना ७५ धावांनी खिशात घातला.
Match 53. Lucknow Super Giants Won by 75 Run(s) https://t.co/xxTbopT08k #LSGvKKR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
या सामन्यात कोलकाताकडून फलंदाजी करताना आंद्रे रसेलने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने अवघ्या १९ चेंडूत ४५ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ३ चौकार आणि ५ षटकारांचा पाऊस पाडला. याव्यतिरिक्त सुनील नारायणने २२ धावा आणि ऍरॉन फिंचने १४ धावा केल्या. इतर एकाही फलंदाजाला १० धावांचा आकडा पार करता आला नाही.
WHAT A WIN this for the @LucknowIPL. They win by 75 runs and now sit atop the #TATAIPL Points Table.
Scorecard – https://t.co/54QZZOwt2m #LSGvKKR #TATAIPL pic.twitter.com/NYbP1S2xIt
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
यावेळी कोलकाताच्या फलंदाजांना तंबूत धाडण्याचं काम लखनऊच्या प्रत्येक गोलंदाजाने केले. यावेळी आवेश खान आणि जेसन होल्डर सर्वांमध्ये उजवे ठरले. आवेशने ३ षटके गोलंदाजी करताना १९ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच, होल्डरनेही २.३ षटकात ३१ धावा देत ३ विकेट्स आपल्या नावावर केल्या. विशेष म्हणजे, होल्डरने १४.३ षटकातच सामना गुंडाळत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. याव्यतिरिक्त मोहसिन खान, दुष्मंता चमीरा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सकडून यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २९ चेंडूत ५० धावा करत आपले अर्धशतक झळकावले. या धावा करताना त्याने ३ षटकार आणि ४ चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त दीपक हुड्डाने ४१ धावा, मार्कस स्टॉयनिसने २८ धावा आणि कृणाल पंड्याने २५ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांना २० धावांचा आकडा शिवता आला नाही. आयुष बदोनीने १५, तर जेसन होल्डरने १३ धावा केल्या. यावेळी कर्णधार केएल राहुलला खास कामगिरी करता आली नाही. तो शून्य धावेवर बाद झाला. मात्र, इतर फलंदाजांनी केलेल्या जबरदस्त फटकेबाजीमुळे संघाला समाधानकारक धावसंख्या उभारता आली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी कोलकाताकडून गोलंदाजी करताना आंद्रे रसेलनेच सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याने ३ षटके गोलंदाजी करताना २२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. तसेच, टीम साऊदी, शिवम मावी आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या खिशात घातली.
या विजयासह लखनऊ सुपर जायंट्स संघाने गुणतालिकेत गुजरात टायटन्सला मात देत अव्वलस्थान पटकावले आहे. तसेच, कोलकाता नाईट रायडर्स संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी कायम आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केएल राहुल सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, पाहा कोणी उधळलीत स्तुतीसुमने
रबाडाला ‘बच्चा’ समजणे बटलरला पडले महागात, पहिल्या ५ चेंडूवर चोपल्यानंतर गोलंदाजाने ‘असा’ काढला काटा