इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२२) पुढील हंगामात लखनऊ व अहमदाबाद या फ्रॅंचाईजी खेळताना दिसणार आहेत. मोठी बोली लावत हे संघ आयपीएलमध्ये दाखल झाले आहेत. २२ जानेवारी रोजी या दोन्ही संघांनी आपले प्रत्येकी तीन ड्राफ्ट खेळाडू जाहीर केले. त्यानंतर लखनऊ फ्रॅंचाईजीने आपल्या संघाच्या अधिकृत नाव लखनऊ सुपरजायंट्स असल्याचे घोषित केले होते. आता त्यांनी आपला अधिकृत लोगो ही प्रसिद्ध केला आहे.
ट्विट करत दिली माहिती
लखनऊ सुपरजायंट्स संघाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून संघाच्या नव्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या नव्या लोगोमध्ये भारताच्या ध्वजातील असलेले तीन रंग दिसत आहेत. तसेच क्रिकेटचे प्रतीक म्हणून बॅट व बॉल देखील या लोगोमध्ये सामील आहे. संघाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार यामध्ये गरुडाची प्रतिकृती दाखवली गेली आहे. लखनऊ संघाकडून केलेले ट्विटमध्ये लिहिले आहे की,
Soaring towards greatness. 💪🏼
Lucknow Super Giants is all set to stretch its wings. 🔥
Prepare for greatness! 👊🏼#LucknowSuperGiants #IPL pic.twitter.com/kqmkyZX6Yi— Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 31, 2022
‘महानतेकडे वाटचाल… लखनऊ सुपरजायंट्स आपले पंख विस्तारण्यासाठी सज्ज आहे… तयार रहा’
लखनऊ फ्रॅंचाईजीने आपल्या संघाचे नाव ठरवण्यासाठी चाहत्यांना आवाहन केले होते. एका आठ वर्षाच्या मुलाने संघाला लखनऊ सुपरजायंट्स असे नाव ठेवण्याचे सुचवले होते. विशेष म्हणजे यापूर्वी आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स या नावाची फ्रॅंचाईजी होती.
हे तीन खेळाडू केले ड्राफ्ट
प्रसिद्ध भारतीय उद्योगपती संजीव गोयंका यांच्या मालकीच्या लखनऊ संघाने भारतीय कर्णधार केएल राहुल, ऑस्ट्रेलियाचा प्रमुख अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस व युवा भारतीय लेगस्पिनर रवी बिश्नोई यांना ड्राफ्ट खेळाडूंचा रूपात निवडले आहे. त्यांना अनुक्रमे १५ कोटी, ११ कोटी व ४ कोटी अशी रक्कम करारबद्ध करण्यासाठी देण्यात आली. राहुल या संघाचा कर्णधार असेल.
असा आहे संघाचा सपोर्ट स्टाफ
भारताचा माजी सलामीवीर व कोलकता नाईट रायडर्सला दोन वेळा आयपीएल विजेते बनवणारा गौतम गंभीर संघाचा मेंटर असेल. तर, संघाचे मुख्य प्रशिक्षक ऍण्डी फ्लॉवर असतील. तर, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी यष्टीरक्षक विजय दहिया यांची वर्णी लागली आहे.
महत्वाच्या बातम्या–