भारताचे माजी फिरकीपटू एम व्यंकटरमण यांची शुक्रवारी (३० जुलै) आगामी घरगुती हंगामासाठी तामिळनाडूच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) आपल्या बैठकीत ही नियुक्ती केली आहे. ८० च्या दशकात भारतासाठी एक कसोटी आणि एकदिवसीय सामना खेळणाऱ्या ५५ वर्षीय व्यंकटरमण यांनी डी वासु यांची जागा घेतली आहे.
व्यंकटरमण यापूर्वी तामिळनाडू प्रीमियर लीग टी२० स्पर्धेत प्रशिक्षणाशी संबंधित कार्य केले आहे. सीएसीने एस वासुदेवन यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ निवड समितीची नेमणूक केली आहे. या समितीचे इतर सदस्य के भरत कुमार, आर व्यंकटेश, तन्वीर जब्बार आणि टी आर अरासू आहेत. यासह, आर रामकुमार यांची २३ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
व्यंकटरमण यांची कारकीर्द
व्यंकटरमण यांनी तामिळनाडूमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत. त्यानी १९८७-८८ मध्ये रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले होते आणि या हंगामात त्यांनी ३५ विकेट्स घेतल्या होत्या. पुढे १९८८-८९ हंगामात आणखी ३० विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्यांना न्यूझीलंड क्रिकेट संघाविरुद्ध भारतीय एकदिवसीय संघात स्थान मिळाले होते. त्यांनी आपला एकमेव एकदिवसीय सामना वडोदरा येथे खेळला आणि २ विकेट्स घेतल्या होत्या. व्यंकटरमण यांचा एकमेव कसोटी सामना १९८८-८९ मध्ये जमैका येथे वेस्ट इंडीज क्रिकेट संघाविरुद्ध झाला होता. त्यांनी पहिल्या डावात एक विकेट घेतली आणि त्यांची एकमेव कसोटी विकेट डेसमंड हेन्स हे होते.
त्यांनी आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत २४७ विकेट्स घेतल्या आहेत. त्यापैकी २१२ तमिळनाडूसाठी होत्या. २००० मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण क्षेत्र स्वीकारले होते. त्यांनी २०११ पर्यंत सिंगापूर क्रिकेट असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले. ते बीसीसीआय अकादमीमध्ये स्पिन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत असत.
महत्त्वाच्या बातम्या-
नॉटिंघमच्या मैदानावर भारताची बल्ले-बल्ले! आजपर्यंत केली आहे ‘अशी’ जबरदस्त कामगिरी
बॉस, है हुकुम का इक्का…! कोलंबो विमानतळावर धवन, भुवी अन् चाहरची ‘स्टायलिश एंट्री’, बघा व्हिडिओ
पहिल्या ३ कसोटीत कोहली, रहाणे अन् पुजारा घालणार धावांचा रतीब, माजी कर्णधाराचा दावा