बेंगळुरू | हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) रविवारी बेंगळुरू एफसीची कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नईयीन एफसीविरुद्ध लढत होत आहे. श्री कांतीरवा स्टेडियमवरील लढत बेंगळुरूसाठी महत्त्वाची आहे. त्यांच्याप्रमाणेच चेन्नईयीनला सुद्धा पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे लढत चुरशीची होईल.
गेल्या दोन मोसमांमधील या विजेत्यांना अद्याप फॉर्म गवसलेला नाही. त्यांच्यासमोरील समस्या सारख्याच आहेत. गतविजेत्या बेंगळुरूच्या तीन बरोबरी झाल्या असून त्यांचा आठवा क्रमांक आहे. 2017-18 मधील विजेता चेन्नईयीन तीन सामन्यांतून एकमेव बरोबरीसह तळात आहे.
रविवारी विजय मिळाल्यास हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय ब्रेकला सकारात्मक दृष्टिकोनाने सामोरे जाऊ शकतील. दोन्ही संघांना गोल करण्याच्या समस्येने ग्रासले आहे. बेंगळुरूने तीन सामन्यांतून किमान एक तरी गोल केला आहे. चेन्नईयीनला मात्र गोलचीही प्रतिक्षा आहे.
असे असले तरी दोन्ही संघांसाठी अगदीच निराशेचे वातावरण नाही. बेंगळुरूची सलामीला नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध गोलशून्य बरोबरी झाली. त्यानंतर एफसी गोवा संघाविरुद्ध त्यांनी पकड मिळविली होती. केवळ भरपाई वेळेत त्यांना पेनल्टीवरील गोलला सामोरे जावे लागले. जमशेदपूर एफसीविरुद्ध मात्र गोलरक्षक सुब्रत पॉलने त्यांना निरूत्तर केले.
बेंगळुरूचे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांनी सांगितले की, फुटबॉलमध्ये अशा गोष्टी घडतात. काही वेळा अनुकूल गोष्टी घडण्याचा प्रश्न असतो, पण त्यामागे ठोस असे कोणतेही कारण नसते. हा केवळ आकड्यांचा प्रश्न असतो. चेन्नईयीनसाठी सुद्धा हेच लागू होते. त्यांना अनेक सामन्यांत गोल करता आलेला नाही, पण हे चित्र ते नक्कीच बदलतील. आम्ही वेगवेगळ्या खेळाडूंसह गोलच्या संधी निर्माण केल्या आहेत आणि ते महत्त्वाचे आहे.
आपल्या संघाचा बचाव कसा होतो आहे याबद्दल स्पेनचे कुआद्रात समाधानी असतील. अल्बर्ट सेरॅन याची दुखापतीमुळे गैरहजेरी हाच एकमेव चिंतेचा मुद्दा आहे. कुआद्रात म्हणाले की, आम्ही संघासह चांगले काम करीत आहोत. पहिल्या तीन सामन्यांत मी हे पाहिले आहे. आम्ही गोल करीत नसलो तरी कामगिरीत सातत्य राखले आहे.
जॉन ग्रेगरी यांच्या चेन्नईयीनने गेल्या मोसमाच्या तुलनेत आघाडी फळीची फेररचना केली आहे. ढिसाळ फिनिशींग आणि चुकीच्या निर्णयप्रक्रियेमुळे त्यांना गोल करता आलेला नाही.
ग्रेगरी यांनी सांगितले की, खरे तर खास करून गेल्या दोन सामन्यांत आम्ही फार चांगला खेळ केला आहे. प्रत्येकी 20 असे 40 शॉट आम्ही दोन सामन्यांत मारले. आम्ही गोल करायला हवा होता हे मान्य आहे. आम्ही दोन सामन्यांत सहा गुण मिळवायला हवे होते.
चेन्नईयीनला सलामीस गोव्यामध्ये 0-3 असे गारद व्हावे लागले. मुंबई सिटी एफसी आणि एटीके यांच्याविरुद्ध त्यांनी बचाव चोख केला. त्यांना केवळ एकच गोल पत्करावा लागला.
चेन्नईयीनकडे अनिरुध थापा, रॅफेल क्रीव्हेलॅरो असे मध्य फळीतून प्रभाव पाडू शकणारे खेळाडू आहेत. क्षमतेचे मैदानावर कामगिरीत रुपांतर करण्यात त्यांना यश येणार का हे मात्र पाहावे लागेल. विजयासाठी आतूर असलेल्या आणखी एका भक्कम प्रतिस्पर्ध्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
इंग्लंडच्या ग्रेगरी यांनी सांगितले की, 2016 मध्ये बेंगळुरूने आयएसएलमध्ये प्रवेश केल्यापासून त्यांच्यात आणि आमच्यात कडवी चुरस होते. खुप काही पणास लागलेले असते. त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या चाहत्यांना चुरशीचा थरार अनुभवता येतो. बेंगळुरूमध्ये मोसमातील पहिल्या विजय मिळविल्यास त्याहून चांगली गोष्ट घडू शकणार नाही. हा नुसता फुटबॉल सामना नसून त्यापेक्षाही खूप काही आहे.
चेन्नईयीनचा आयएसएलमधील याआधीचा गोल गेल्या मोसमात फेब्रुवारीत झाला. योगायोग असा की बेंगळुरूविरुद्धच हे घडले होते. तेव्हा चेन्नईयीनची 2-1 अशी सरशी झाली होती.
रविवारी त्या निकालाची पुनरावृत्ती करण्याची आशा ग्रेगरी यांच्या संघाला असेल. दुसरीकडे कुआद्रात यांचा संघ दक्षिणेतील कट्टर प्रतिस्पर्ध्याची घसरण आणखी तीव्र करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरेल.