इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामात अनेक खेळाडू चर्चेत आले. अनेकांनी आपल्या खेळातून इतरांना प्रभावित केले, तर अनेकांनी काही नकोशी कृती करत चर्चेत येण्याचा मान मिळवला. असाच एक खेळाडू रियान पराग ज्याने एकदा नव्हे, तर अनेकदा आपल्या कृतीतून वाद ओढावून घेतला आहे.
कधी वरिष्ठ खेळाडू आर अश्विन (R Ashwin) याला खुन्नस देणे, कधी युवा खेळाडू देवदत्त पडिक्कल (Devdutta Padikkal) याच्यावर डाफरणे तर कधी अंपायरच्या निर्णयावर चुकीची प्रतिक्रिया देणे. अशी कृत्य रियानने यंदाच्या आयपीएलमध्ये केली. त्यामुळे अनेकांनी रियानवर टीका केली आहे. आता तर थेट १९८३ विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूनेही रियानला खडेबोल सुनावले आहेत.
“रियान परागने (Riyan Parag) आयपीएल २०२२चे सर्व सामने खेळले, परंतु एकाही सामन्यात काही विशेष कामगिरी केली नाही. तो इतका मोठा खेळाडू नाही की, जो सामना फिरवू शकेल. आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी त्यांच्या खेळात सुधारणा केली आहे. मात्र, या खेळाडूला ज्याप्रकारे संधी मिळाली, त्यात कोणतीही सुधारणा झालेली दिसली नाही. तो ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो ते टी-२० क्रिकेटमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, रियानने प्रभावित करावी, अशी कामगिरी केली नाही,” असं म्हणत भारताच्या पहिल्या विश्वविजयी संघातील खेळाडू मदनलाल यांनी रियानवर निशाणा साधला आहे.
मदनलाल पुढे म्हणाले की, “तो ज्या क्रमांकावर खेळायला येतो, तेथील खेळाडूचे काम जलद धावा करणे असते. त्या स्थानावर तुम्ही धावा केल्या नाहीत, तर तिथून तुमच्या अडचणी वाढतात.” रियानला अनेक दिग्गजांनी त्याला फटकारले असले, तरी संघाचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकाराची विचारसरणी अगदी उलट आहे. आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यानंतर संगकारा म्हणाला की, “रियान परागमध्ये भरपूर क्षमता आहे आणि पुढच्या हंगामात तो फलंदाजीत सुधारणा करून विशेष कामगिरी करू शकेल.”
मदनलाल हे भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ३९ कसोटी आणि ६७ वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी अनुक्रमे १०४२ आणि ४०१ धावा केल्या आहेत. शिवाय मदनलाल यांच्या नावे कसोटी सामन्यांत ७१, तर एकदिवसीय सामन्यांत ७३ बळी आहेत.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग! सौरव गांगुलीने सोडले बीसीसीआयचे अध्यक्षपद? ट्विटरवरून दिले संकेत