विजय हजारे ट्रॉफी २०२१ ची अंतिम लढत मुंबई आणि उत्तर प्रदेश दरम्यान खेळली जात आहे. या सामन्यात उत्तर प्रदेशचा सलामीवीर फलंदाज माधव कौशिकने दीडशतक झळकावले. कौशिकने आपल्या शतकासह ५ विक्रम आपल्या नावे केले. उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना ४ गडी गमावून ३१२ धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दीडशे धावा करणारा माधव कौशिक स्पर्धेच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला.
सामन्यात यूपीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात अत्यंत संत झाली. कौशिक पहिल्या २३ चेंडूत एकही धाव करू शकला नाही. २४ व्या चेंडूंवर एक धाव घेऊन त्याने आपले खाते उघडले. १० षटकांनंतर संघाची धावसंख्या बिनबाद २८ होती. यानंतर, कौशिक आणि समर्थ सिंह (५५) धावांची गती वाढवली. दोघांनीही पहिल्या गड्यासाठी २६ षटकांत १२२ धावांची भागीदारी केली.
कौशिकच्या लिस्ट ए कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास त्याने ५ सामन्यांत ८५ धावा केल्या होत्या. त्याची सर्वाधिक धावासंख्या ३४ होती. अंतिम सामन्याआधी त्याने एकही अर्धशतक ठोकले नव्हते. हे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतक आहे. त्याने आपल्या नाबाद १५८ धावांच्या खेळीमध्ये १५ चौकार आणि ४ षटकार लगावले. सध्याच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत कौशिक तिसरा सामना खेळत आहे. यापूर्वी त्याने उपांत्य सामन्यात गुजरातविरुद्ध १५ तर दिल्लीविरुद्ध १६ धावा केल्या होत्या.
तेवीस वर्षीय कौशिकने आत्तापर्यंत ९ प्रथमश्रेणी सामन्यात २९ च्या सरासरीने ३५० धावा केल्या आहेत. याशिवाय तीन टी२० सामन्यात त्याने ५६ धावा काढल्या आहेत. यूपीच्या संघाने १६ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
कौशिकने केलेले पाच विक्रम-
१) विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
२) डावाचा पहिला आणि अखेरचा चेंडू खेळला.
३) संघासाठी अर्ध्यापेक्षा जास्त धावा बनवल्या.
४) २० पेक्षा जास्त चेंडू खेळून खाते खोलल्यानंतर दीडशतक करणारा पहिला फलंदाज
५) अंतिम सामना खेळण्याआधी जेवढ्या धावा लिस्ट ए कारकिर्दीत बनवल्या नव्हत्या त्यापेक्षा अधिक धावा अंतिम सामन्यात केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
युवराज सिंग भारतीय संघात पुनरागमन करणार? पहा काय म्हणाला
इशान किशनने सांगितले खेळातील सुधारणेचे रहस्य, ‘या’ खेळाडूंना श्रेय देत म्हणाला…
किती ते दुर्दैव! विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वी-पड्डीकलने खोऱ्याने काढल्या धावा, तरीही वनडेत संधी नाही