भारतातील प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा, रणजी ट्रॉफी २०२१-२२चा हंगाम अखेरीस आला आहे. १४ ते १८ जूनदरम्यान झालेल्या उपांत्य सामन्यांचा निकाल लागला असून अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी संघ निश्चित झाले आहेत. अलूर येथे झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात मध्य प्रदेशने बंगालवर १७४ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. यासह मध्य प्रदेशचा संघ तब्बल २३ वर्षांनंतर अंतिम सामन्यात पोहोचला आहे. अंतिम सामन्यात त्यांची भिडंत ४१ वेळच्या विजेत्या मुंबई संघासोबत होईल.
कसा राहिला पहिला उपांत्य सामना
अंतिम सामन्यात (Ranji Trophy Final) पोहोचण्यासाठी मध्य प्रदेशपुढे पहिल्या उपांत्य सामन्यात बंगाल (First Semi Final) संघाचे आव्हान होते. या सामन्यातील पहिल्या डावात धडाकेबाज सुरुवात करत मध्य प्रदेशने सामन्यावर मजबूत पकड बनवली होती. प्रथम फलंदाजी करताना १०५.३ षटके खेळताना ३४१ धावा केल्या होत्या. मध्य प्रदेशकडून या डावात सलामीवीर आणि यष्टीरक्षक हिमांशू मंत्रीने सर्वाधिक १६५ धावा केल्या होत्या. या खेळीसाठी त्याने १ षटकार आणि १९ चौकार मारले होते. तसेच अक्षत रघुवंशी यानेही (६३ धावा) अर्धशतकी खेळी केली होती. या डावात बंगालकडून मुकेश कुमारने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच शाहबाज अहमदने ३ विकेट्सचे योगदान दिले होते.
प्रत्युत्तरात बंगालचा संघ पहिल्या डावात ८९.२ षटकात २७३ धावा करण्यात यशस्वी झाला होता. त्यामुळे पहिल्या डावात मध्य प्रदेशने ६८ धावांनी आघाडी घेतली होती. या डावात बंगालकडून मनोज तिवारी आणि शाहबाज अहमद यांनी शतके केली होती. तिवारीने २११ चेंडू खेळताना १२ चौकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या होत्या. तसेच अहमदने २०९ चेंडूत १२ चौकार मारत ११६ धावांची खेळी केली होती. परंतु बंगालचे इतर फलंदाज मोठ्या खेळी करू शकले नसल्याने बंगालचा संघ पहिल्या डावात पिछाडीवर राहिला.
https://twitter.com/BCCIdomestic/status/1538099953704509440?s=20&t=3JQJoT9Qb1QHb7yRYnX0Mg
त्यानंतर दुसऱ्या डावात मध्य प्रदेशने (Madhya Pradesh) फलंदाजी करताना ११४.२ षटकात २८१ धावा फलकावर लावल्या. या डावात मध्य प्रदेशकडून कर्णधार आदित्य श्रीवास्तवने सर्वाधिक ८२ धावा केल्या होत्या. तसेच रजत पाटीदार ७९ धावांची खेळी खेळला होता. या डावातही शाहबाज अहमदने शानदार गोलंदाजी करत ५ विकेट्स नावे केल्या होत्या. तर प्रदिप्त परमानिकने ४ फलंदाजांना तंबूत धाडले होते.
शेवटच्या डावात बंगलला विजयासाठी ३४९ धावांची गरज होती. परंतु बंगालला १७५ धावाच करता आल्या. बंगालकडून या डावात फक्त एकटा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन (७८ धावा) अर्धशतक करू शकला. परिणामी १७४ धावांनी मध्य प्रदेशने हा सामना जिंकला. या विजयासह मध्य प्रदेशचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे.
२३ वर्षांनंतर अंतिम सामना खेळणार मध्य प्रदेश
यापूर्वी १९९८-९९ मध्ये मध्य प्रदेशला अंतिम सामन्यात पोहोचता आले होते. त्यावेळी त्यांचा सामना कर्नाटकशी झाला होता. कर्नाटकने त्यांना या सामन्यात पराभूत केल्याने मध्य प्रदेशला विजयाची चव चाखता आली नव्हती. मात्र यावेळी मध्य प्रदेशकडे ती संधी असेल, त्यामुळे ते आपला पूर्ण जोर लावतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘कर्णधार’ म्हणून पहिली टी२० मालिका जिंकण्याची पंतकडे संधी, सीरिज गमावल्यास मोडेल ‘तो’ अजेय विक्रम
कर्णधार पंतपुढे टी२० मालिका वाचवण्याचे आव्हान, निर्णायक सामन्यात कोणाचे पारडे जड? पाहा प्लेइंग Xi
INDvSA । मालिकेच्या निर्णायक सामन्याची खेळपट्टी कशी असेल?, वाचा एका क्लिकवर






