सध्या भारतात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे (Syed Mushtaq Ali Trophy 2022-2023) सामने खेळले जात आहेत. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या या स्पर्धेच्या चौथ्या फेरीचे सामने रविवारी (16 ऑक्टोबर) खेळले गेले. महाराष्ट्राने आपल्या या चौथ्या सामन्यात मेघालयला 74 धावांनी पराभूत करत स्पर्धेतील सलग दुसरा विजय संपादन केला. अनुभवी फिरकीपटू सत्यजित बच्छाव हा महाराष्ट्राच्या विजयाचा नायक ठरला.
मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मेघालय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. त्यांनी महाराष्ट्राच्या फलंदाजांना मोकळ्या हाताने फलंदाजी न करू देता केवळ 144 धावांवर रोखले. महाराष्ट्रासाठी कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 38 धावा केल्या. राहुल त्रिपाठी व यश क्षीरसागर यांनी अनुक्रमे 28 व 27 धावांचे योगदान दिले. मेघालय संघासाठी अभिषेक कुमारने सर्वाधिक चार बळी मिळवले.
या आव्हानाचा पाठलाग करताना मेघालय संघाच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. अनुभवी फिरकीपटू सत्यजित बच्छावने 4 बळी घेत मेघालयच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. विकी ओस्तवाल व शमशुझमा काझी यांनी प्रत्येकी दोन बळी घेत त्याला साथ दिली. महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी केवळ 18.1 षटकात मेघालयचा डाव 70 धावांवर संपवत 74 धावांनी विजय साजरा केला. सत्यजित बच्छाव याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर महाराष्ट्राने जम्मू काश्मीर विरुद्ध आपला पहिला विजय मिळवला होता.
महाराष्ट्रा सोबतच मुंबईने देखील आपला विजयरथ कायम ठेवला. उत्कृष्ट संगीत कामगिरीच्या जोरावर त्यांनी विदर्भाचा 15 धावांनी पराभव केला. मुंबईचा हा स्पर्धेतील सलग चौथा विजय आहे. या विजयासह मुंबईचे बाद फेरीतील स्थान देखील निश्चित मानले जातेय.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! कोरोना झाला, तरी टेन्शन नाही; टी20 विश्वचषकात बिनधास्त खेळू शकतात खेळाडू
भारत-पाक ‘क्रिकेटयुद्ध’ होणाऱ्या एमसीजीचा काय आहे इतिहास? कशी आहे आकडेवारी? वाचा सविस्तर