भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कनिष्ठ निवड समितीने आगामी अंडर 19 आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. पंजाबचा उदय सहारन हा संघाचे नेतृत्व करेल. या संघात महाराष्ट्राचे अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी व सचिन धस यांचा समावेश आहे. यापैकी सचिन हा बीड जिल्ह्यातील रहिवासी असून, भारताच्या अंडर 19 संघात निवड झालेला बीडचा तो पहिला खेळाडू आहे.
मागील दोन वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेल्या सचिनला क्रिकेट खेळण्याची आवड त्याच्या वडिलांमुळे निर्माण झाली. त्याचे वडील संजय धस हे चांगले क्रिकेटपटू होते. सचिन तेंडुलकर आवडता खेळाडू असल्याने त्यांनी आपल्या मुलाचे नाव देखील सचिन असे ठेवले. सचिन वयाच्या आठव्या वर्षापासून क्रिकेट प्रशिक्षक अझर यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.
https://twitter.com/BCCI/status/1728367043953713619?t=LB7r1-G9wAVmQf6PUtAv5g&s=19
सचिनचे वडील संजय हे सध्या आरोग्य विभागात तर आई पोलीस विभागात कार्यरत आहे. जून महिन्यात झालेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये देखील त्याने कोल्हापूर टस्कर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच काही दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या कुच बिहार ट्रॉफी व सध्या खेळल्या जात असलेल्या अंडर 19 चौरंगी मालिकेत त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत तब्बल पाच शतके झळकावली आहेत.
अंडर 19 आशिया चषकासाठी भारतीय संघ: अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, उदय सहारन (कर्णधार), ए. अवनिश राव, सौमी कुमार पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.
राखीव: प्रेम देवकर, अंश गोसाई व मोहम्मद अमान.
(Maharashtra Beed District Cricketer Sachin Dhas Selected For U19 Asia Cup 2023-2024)
महत्वाच्या बातम्या –
“त्यादिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ…”, वर्ल्डकप फायनलच्या पराभवाविषयी शास्त्रींचे मोठे वक्तव्य
एमएसएलटीए 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथन याला दुहेरी मुकुट






