“४५वी कुमार/कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धात कलकत्ता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात काळ पासून सुरू झालेल्या ” ४५व्या कुमार/कमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजयी सलामी दिली. मुलांच्या क गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या मुलांनी झारखंडचा ५८-१६असा धुव्वा उडवीत विजयी सलामी दिली.
मध्यांतराला ३३-०७ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने नंतर थोडा सावध खेळ करीत हा विजय साकारला. सौरभ पाटील, शुभम शेळके, पंकज मोहिते यांच्या धारदार चढाया त्याला कोपरारक्षक असलम इनामदार व मधरक्षक वैभव गर्जे यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हे सहज शक्य झाले. महाराष्ट्रसह या गटात झारखंड, हिमाचल प्रदेश हे दोन संघ या क गटात आहेत.
महाराष्ट्राच्या मुलींचा ड गटात समावेश असून केरळ, ओडीसा हे दोन संघ त्यांच्या गटात आहेत. काळ महाराष्ट्राच्या मुलींनी केरळचा ३९-१५असा पराभव करीत आगेकूच केली. मध्यांतराला १७-०६ अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने उत्तरार्धात आपल्या खेळाची गती वाढवित हा विजय साजरा केला.
प्रतीक्षा तांडेल, सोनाली हेळवी यांच्या दमदार चढाया आणि साक्षी रहाटे, काजल खैरे, तेजा सपकाळ यांचा भक्कम बचाव या विजयात महत्वपूर्ण ठरला. आता महाराष्ट्राचा साखळीतील एक सामना ओडीसा बरोबर शिल्लक आहे. तर मुलांचा साखळीतील शेवटचा सामना हिमाचल प्रदेश बरोबर होणार आहे.
मुलांच्या विभागात ३२ संघांनी, तर मुलींच्या विभागात २७ संघांनी सहभाग घेतला आहे. या दोन्ही गटातील सहभागी संघाची ८-८ गटात विभागणी केली असून सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविले जातील.






