---Advertisement---

अजित पवार यांच्या निधनाने देश शोकसागरात, क्रिकेटपटूंनी व्यक्त केली भावना

On: बुधवार, जानेवारी 28, 2026 3:02 PM
---Advertisement---

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीला जात असताना झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानात जात असलेल्या एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 28 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी अजित पवार यांचे खासगी विमान VT-SSK बारामती विमानतळावर उतरणार होते. मात्र लँडिंगदरम्यान हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले.

अजित पवार हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी जात होते. या दुर्दैवी अपघातात त्यांच्या दोन निकटवर्तीय सहकाऱ्यांसह दोन क्रू मेंबर्सचाही मृत्यू झाला. DGCA आणि स्थानिक प्रशासनाने या घटनेला दुजोरा देत, विमानातील सर्व प्रवासी अपघातात मृत्युमुखी पडल्याची अधिकृत माहिती दिली आहे.

अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्तानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात शोककळा पसरली आहे. राजकीय, सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी महान खेळाडू सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत दुःख व्यक्त केले आहे. “महाराष्ट्राने आज एक समर्पित नेता गमावला आहे. त्यांनी संपूर्ण राज्यासाठी निष्ठेने काम केले. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना. ओम शांती,” असे सचिनने म्हटले आहे.

त्याचप्रमाणे भारतीय संघाचा खेळाडू अजिंक्य रहाणे यानेही दुःख व्यक्त केले आहे. “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांच्या दुर्दैवी निधनाने मन अत्यंत व्यथित झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना,” अशी पोस्ट त्याने केली आहे.

याशिवाय भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण यांनीही या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. “अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या बातमीने मी अत्यंत दुःखी झालो आहे. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो,” असे अझरुद्दीन यांनी म्हटले आहे.

युसूफ पठाण यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी हानी झाली आहे. सार्वजनिक सेवेतील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---