टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी२० आणि कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठीच्या तयारींना सुरुवात झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेला १७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर कसोटी मालिका होणार आहे. त्यातच क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्टेडियम १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
दीड वर्षांपासून रिकाम्या पडलेल्या वानखेडे स्टेडियमवर पुन्हा एकदा प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळणार आहे. वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी महाराष्ट्र सरकार प्रेक्षकांना पूर्ण क्षमतेने स्टेडियममध्ये प्रवेश देण्यास तयार झाले आहे.
एका सूत्राने सांगितले, “होय, सरकारने एमसीएला वानखेडेवरील दुसऱ्या कसोटीसाठी १०० टक्के क्षमतेची परवानगी दिली आहे. आम्ही सोमवार (१५ नोव्हेंबर) पासून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सराव सत्रही आयोजित करू जेणेकरून खेळाडूंना मालिकेसाठी सज्ज होण्याची चांगली संधी मिळेल.”
यापूर्वी झारखंड सरकारने रांची येथे होणाऱ्या टी२० सामन्यासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लावले होते. रांचीच्या जेएससीए क्रिकेट स्टेडियममध्ये १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० सामना पाहण्यासाठी चाहत्यांना कोविड चाचणी प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. तसेच स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी, प्रेक्षकांना १५ नोव्हेंबरनंतरचे ‘आरटीपीसीआर’ किंवा ‘कोविड लसीचे दोन्ही डोस’ या अहवालांचा पुरावा दाखवावा लागणार आहे.
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भारतीय दौरा १७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात उभय संघांमध्ये ३ टी२० आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
टी२० आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाले आहेत. रोहित शर्मा टी२० मालिकेत संघाचे नेतृत्व करेल, तर अजिंक्य रहाणे पहिल्या कसोटीत संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. कारण विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात कोहली कसोटीची कमान सांभाळेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबो! भारत-न्यूझीलंड संघाच्या पहिल्या टी२० सामन्यासाठी स्टेडियमवर असणार ‘एवढ्या’ पोलिसांचा बंदोबस्त
खेलरत्न पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर मिताली राज झाली भावुक; म्हणाली, ‘मनापासून आशा आहे की…’
पाकिस्तान संघाला ८ वर्षाच्या चिमुकल्याने पत्र लिहून मागितले ऑटोग्राफ, बाबर आझमने दिले ‘असे’ उत्तर