महाराष्ट्र आयर्नमॅन संघाची प्रीमिअर हँडबॉल लीगमध्ये विजयी घोडदौड सुरूच आहे. जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या लीगमध्ये महाराष्ट्र आयर्नमॅन संघाने शुक्रवारी दिल्ली पँझर्सवर 40-31 असा विजय मिळवला. लीगमधील हा त्यांचा पाचवा अन् दिल्ली पँझर्सवरील दुसरा विजय ठरला आणि 10 गुणांसह ते टेबल टॉपर बनले आहे. कर्णधार इगोर चिसेलिओव्ह, जलाल कियानी आणि अंकित कुमरा यांनी पुन्हा एकदा दमदार खेळ करताना आयर्नमॅनच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
पहिल्या 15 मिनिटांत सामना महाराष्ट्र आयर्नमॅनच्या 6-5 असा बाजूने होता. नवीन देश्वालने काही अप्रतिम बचाव करताना महाराष्ट्र आयर्नमॅनची आघाडी कायम ठेवली. दिल्ली पँझर्सला गोल करण्यात अपयश येत असताना आयर्नमॅन सातत्याने आक्रमक खेळ करून गोल करत होते. कियानी आणि चिसेलिओव्ह यांच्या आक्रमणाच्या जोरावर आयर्नमॅनने पहिल्या हाफमध्ये 18-12 अशी आघाडी मिळवली.
दिल्ली पँझर्सने दुसऱ्या हाफमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यासमोर देश्वालने मजबूत बचाव भिंत उभी केली होती. चिसेलिओव्हने आजच्या सामन्यातही अविश्वसनीय कामगिरी केली आणि लीगमध्ये ५० गोल्स करणारा तो दुसरा खेळाडू ठरला. दुसऱ्या हाफच्या मध्यंतरापर्यंत आयर्नमॅनकडे 28-21 अशी आघाडी होती. कियानी आणि चिसेलिओव्ह यांचा खेळ अव्वल दर्जाचा राहिला. शेवटच्या 10 मिनिटाला आयर्नमॅनने ही आघाडी 35-27 अशी भक्कम करताना विजयाकडे कूच केली.
आयर्नमॅनने सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. कियानीनेही या सामन्यातून लीगमध्ये 50 गोल्सचा टप्पा ओलांडला आणि असा पराक्रम करणारा आयर्नमॅन संघातील दुसरा व एकंदर तिसरा खेळाडू ठरला. आयर्नमॅनने 40-31 अशी ही लढत जिंकली. चिसेलिओव्ह याही सामन्यात सर्वाधिक 10 गोल करणारा खेळाडू ठरला. दिल्लीकडून जस्मित सिंगने सर्वाधिक 9 गोल केले. चिसेलिओव्हला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला. अंतिम गुणः महाराष्ट्र आयर्नमॅन 40 वि. वि. दिल्ली पँझर्स- 31 (Maharashtra Ironman Table Topper! Another resounding win over Delhi Panzers read)
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत रत्नागिरी जेट्सची सुरेख सुरुवात, सोलापूर टायटन्सला चारली पराभवाची धूळ
MPL स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्सची विजयी सलामी, अर्शिन कुलकर्णीची जबरदस्त फिफ्टी