जालन्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी 2018 स्पर्धेत बुलढाण्याच्या बाला रफिक शेखने गतविजेत्या अभिजित कटकेचा पराभव करत मानाची गदा पटकावली आहे. अभिजितला सलग दुसऱ्यांदा मानाची गदा पटकावण्यात अपयश आले आहे.
26 वर्षीय बाला रफिकने पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला आहे. बाला रफिकने अभिजितला अंतिम फेरीत 11-3 असे पराभूत केले आहे.
अभिजितने सामन्याच्या सुरुवातीला आक्रमक सुरुवात केली होती. पण रफिकने त्याच्याशी अनुभवाच्या जोरावर दोन हात केले. रफिकने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. त्याने अभिजितवर नंतर पूर्णपणे वर्चस्व ठेवत त्याला कोणतीही संधी दिली नाही.
पैलवान बाला रफिकने उपांत्य फेरीत रत्नागिरीच्या संतोष दोरवडला तर अभिजितने सोलापूरच्या रविंद्र छत्रपत्राला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती. बालारफिकची ही तिसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती.
ही स्पर्धा जिंकल्यानंतर बाला रफिकचे 65 वर्षीय वडील अझम शेख यांच्याकडे आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. ते त्यांच्या मुलाचा विजय पाहून भावनिक झाले होते.
21 वर्षीय अभिजित हा मॅटच्या कुस्तीमध्ये तरबेज आहे तर बाला रफिक हा मातीच्या कुस्तीत कुशल आहे. त्यामुळे मॅटवर होणाऱ्या अंतिम फेरीत अभिजितचे पारडे जड असेल असेच सर्वांना वाटले होते. परंतू सर्वांचे अंदाज खोटे ठरवत बाला रफिकने चांदीच्या गदेवर नाव कोरले.
बाला रफिक हा न्यू मोतीबाग तालीम कोल्हापुर वस्ताद हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले पट्टे आहेत. सध्या ते जय हनुमान कुस्ती केंद्र वारजे वस्ताद गणेश दांगट यांच्याकडे सराव करतात.
महत्त्वाच्या बातम्या:
–महाराष्ट्र केसरीच्या मैदानातून- विजेत्या मल्लांना पहिल्यांदाच मिळणार जंबो पदक
–ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेपुर्वी या खेळाडूच झालं शुभमंगल सावधान
–वनडेत संधी मिळाली नाही तर पुजारा-रहाणे या संघाकडून खेळणार तीन मालिका