कुस्ती…. भारताच्या संस्कृतीतला आणि महाराष्ट्राच्या मातीतला खेळ. थोरले छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्तीला राजाश्रय दिला आणि महाराष्ट्राच्या मातीत कुस्ती रुजू लागली. पुढच्या काही दशकातच कुस्तीने मोठ्ठी उभारी घेतली. गावागावात पैलवान तयार होऊ लागले. लोकं कुटुंबातील एकातरी मुलाला पैलवान करायचं असं ठरवून, त्याला तालमीत पाठवू लागली. हळूहळू गावागावात व्यायाम शाळा आणि काही प्रसिद्ध ठिकाणी तालमींची संख्याही वाढली. पैलवान तयार करायला वस्ताद मंडळी खपू लागली. अन् सांज-सकाळी शड्डू ठोकल्याच्या आवाजाने गावकुसं दणाणून निघाल्याचे दिसू लागले.
हा सर्व कुस्तीच्या वाढीचा आणि विस्ताराचा काळ… गेले दोन-अडीचशे वर्षात कुस्तीने मोठा पल्ला गाठला. मातीवरची कुस्ती मॅटवर आली. शाहू महाराजांनी जत्रा-यात्रात रुजवलेली कुस्ती एकविसाव्या शतकात स्पर्धेमध्ये सामावली.
गेल्या अनेक वर्षांत विविध स्पर्धा आणि गावागावात भरणाऱ्या जत्रा-यात्रांमधील आखाडे यांमुळे कुस्तीला सोन्याचे दिवस आले होते. ‘हिंद केसरी’, ‘महाराष्ट्र केसरी’ या मानाच्या स्पर्धा म्हणजे तर पैलवानांच्या आयुष्यातील ‘ऑस्कर’. आख्खं आयुष्य काही पैलवान आणि त्यांचं कुटुंब या स्पर्धांसाठी राबत असतात, मेहनत घेतात. मात्र, मागच्या दीड वर्षांत याच कुस्तीला कोरोनाचा विळखा पडला आणि सारं काही ठप्प झालं.
कुस्ती म्हटलं की पैलवानांची एकमेकांच्या अंगाशी झुंज आली, नियमांची जाणीव करुन देणारे पंच आले आणि महत्वाचं म्हणजे बेंबीच्या देठापासून ओरडत प्रोत्साहन देणारे प्रेक्षक आले. एकूणच काय तर दर्दी प्रेक्षकांची गर्दी हा खरा कुस्तीचा आत्मा… परंतू, कोरोना महामारीने या आत्म्यावरच हल्ला चढवला आणि कुस्तीला कुलूप लागले.
मागील दीड-दोन वर्षांपासून महाराष्ट्रात कुठेही जत्रा-यात्रा भरली नाही. तसेच कोणत्या मैदानी स्पर्धाही होताना दिसत नाहीत. एकूणच काय कोरोनाच्या निर्बंधांमुळे सारंकाही ठप्प झालंय. यात सर्वाधिक नुकसान झालंय ते कुस्ती क्षेत्राचं…
दोन महिन्यांपुर्वीपर्यंत राज्यात व्यायामशाळा बंद होत्या. मैदानेही बंद होती. अशात आखाड्य़ाच्या मातीत घाम गाळणाऱ्या पैलवानांची कोंडी झाली. तरीही अनेक मल्लांनी घरातच व्यायाम आणि सराव सुरु ठेवला.
महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) ही कुस्ती क्षेत्रातील सर्वाधिक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. मागील वर्षभरापासून या स्पर्धेचे आयोजन झालेले नाही. कोरोना महामारीमुळे राज्यातील सर्व यात्रा, जत्रा, उरुस रद्द झाले. त्यामुळे वर्षा, दीड वर्षापासून कुस्त्यांच्या आखाड्यात पैलवानांचा शड्डू घुमला नाही. परिणामी सर्वसामान्य घरातील पैलवानांवर बेरोजगारीची आणि उपासमारीची वेळ आलीये. अशात निदान महाराष्ट्र केसरीची स्पर्धा तरी होईल, या आशेवर राज्यातील हजारो पैलवान वर्षभरापासून सराव करतायेत. परंतू, आता वर्ष उलटून गेले तरीही या स्पर्धेचे आयोजन होत नसल्याने पैलवान मंडळींमध्ये नाराजीचा सूर आहे.
एक पैलवान तयार होण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत असते… त्याच्यापाठीमागे त्याचे आख्खे कुटुंब, वस्ताद मंडळी खपत असतात. स्वतः पैलवान मंडळी त्यांच्या दिनक्रमात फक्त व्यायाम, सराव आणि मेहनत याच गोष्टींचा समावेश करतात. बाहेरच्या जगापासून स्वतःला दूर ठेवतात. पैलवानांचा खुराक, शिकवण यासाठी भरपूर पैसा लागतो. मात्र, कोरोनामुळे आखाडे बंद पडल्याने अनेक पैलवानांवर उपासमारीची वेळ आलीये. कित्येकांनी तर पैलवानकी सोडून चक्क मजूरीचा रस्ता धरलाय. अशात जर महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्यास तमाम पैलवानांना मोठा धीर आणि उभारी मिळू शकते.
पैलवानांची मातृसंस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने जिल्हा तालीम संघाच्या मदतीने सर्व जिल्ह्यांच्या निवड चाचण्या घेतल्या आहेत. तसेच फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचे संकेतही दिले होते. परंतु, राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने आणि तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने, स्पर्धेच्या आयोजनाबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाही.
ऑलिंपिक, आयपीएल सारख्या स्पर्धा जर विनाप्रेक्षक पार पडू शकतात, तर महाराष्ट्र केसरी सारखी स्पर्धा का होऊ शकत नाही? असा सवाल सध्या सर्व पैलवान, वस्ताद मंडळी आणि कुस्तीप्रेमी विचारत आहेत.
महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धेच्या माध्यमातून विजेत्या आणि सहभागी पैलवानांना ठराविक मानधन दिले जाते. हीच रक्कम मल्लांना पुढील वाटचालीसाठी आधार ठरत असते. मात्र, स्पर्धाच न झाल्याने पैसा मिळत नाही, अशावेळी आर्थिक संकट कसे दुर करायचे? पैलवानकी कशी करायची? असा प्रश्न कुस्तीपटूंना सतावत आहे.
महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा घेणे तसे राज्य परिषदेला अवघड नाही. राज्यात पुण्यामध्ये ही स्पर्धा विनाव्यत्य पार पाडता येऊ शकते. नुकतेच राज्य सरकारने पुण्यातील कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल केलेत. तसेच येथील कोरोना परिस्थितीही अटोक्यात आहे. पुण्यात बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलात प्रेक्षक विरहीत स्पर्धा घेण्याची संधी परिषदेकडे उपलब्ध आहे. इथे महाराष्ट्र केसरीची स्पर्धा झाल्यास मल्लांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण होण्यास मदत होऊ शकते.
कुस्ती हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे… राज्यातील अनेक नेते कुस्तीबद्दल प्रेम बाळगुन आहेत. शरद पवारांसारखे नेतृत्व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी आहे. अशावेळी राज्यातील नेतृत्वाने या प्रश्नी लक्ष टाकल्यास ही स्पर्धा सहज होऊ शकेल. आणि वर्षभरापासून स्पर्धेकडे डोळे लावून असलेल्या हजारो मल्लांची प्रतिक्षाही संपेल.
अन्यथा मानाच्या स्पर्धा, गावोगावचे कुस्त्यांचे फड बंद झाल्याने अगोदरच संकटात सापडलेली कुस्ती पुर्णतः संपुष्टात येईल. असे झाल्यास ऑलिंपिकचं काय गावातही कुठे पैलवान दिसणार नाही. हा मोठा संभाव्य धोका महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रापुढे आहे..!