-संजय दुधाने (Twitter- @sanjaydudhane23 )
आज महाराष्ट्र केसरी जालनाचा चौथा दिवस वादातच निघून गेला. गादी विभागात गणेश जगताप विरुद्ध अभिजीत कटके या कुस्तीत झालेला वाद विकोपाला जाऊन पुण्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या मल्लानी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर बहिष्कार टाकला.त्यानंतर गादी विभागातून गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके फायनलमध्ये पोहोचला. दुपारच्या सत्रात माती विभागात अतिशय तुल्यबळ लढती झाल्या.
तिसऱ्या क्रमांकासाठी पैलवान विलास डोईफोडे विरुद्ध पैलवान साईनाथ रानवडे या कुस्तीत विलास विजयी ठरला.आपल्या मातृभूमीत त्याने कांस्यपदक मिळवून जालना जिल्ह्याचे नाव राखल.
अंतिम कुस्ती अतिशय तगडी होती. पैलवान बालारफिक शेख विरुद्ध पैलवान संतोष दोरवड. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील खडकी गावचे असणारे मात्र परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे पैलवान बालारफिक शेख हे महाराष्ट्राच्या कुस्तीतील अतिशय तगडे पैलवान होय.125 किलो वजन व सहा फूट तीन इंच प्रचंड उंची लाभलेले बाला रफिक शेख हे न्यू मोतीबाग तालीम कोल्हापुर वस्ताद हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले पट्टे आहेत.
सध्या ते जय हनुमान कुस्ती केंद्र वारजे वस्ताद गणेश दांगट यांच्याकडे सराव करतात. तर सोलापूर जिल्ह्यातील टाकळी गावचा पैलवान संतोष दोरवड हा रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत होता. जय भवानी शाहूपुरी तालीम कोल्हापूर वस्ताद रवींद्र पाटील यांचा तो पठ्ठा आहे. पैलवान माऊली जमदाडेवर विजय मिळवल्यानंतर पैलवान संतोष दोरवड कढून कुस्तीप्रेमींच्या अपेक्षा वाढल्या होत्या व त्यांच्या अपेक्षेप्रमाणे तो लढला सुद्धा.
कुस्तीला प्रारंभ झाला आणि अनेक कुस्ती शौकिनांच्या भुवया उंचावल्या. वजन आणि आणि उंची नि संतोष दोरवड पेक्षा तगडा असलेला बाला रफिक शेख अगदी सहज संतोष दोरवडवर आक्रमण करत होता. तर यापूर्वी अनेकदा मैदानी कुस्तीत बाला रफीक सोबत खेळण्याचा अनुभव असल्याने संतोष दोरवड ढाक सारखे अवघड डाव मारत होता, मात्र बालारफिक यातून लीलिया वाचत होता. कुस्तीचे तीन मिनिटे संपण्यापूर्वी दोन गुणांची कमाई केली होती त्यानंतर पुन्हा दोन गुण कमावले होते. मात्र दरम्यान संतोष बगल डूब करून कबजा घेण्याचा प्रयत्न केला आणि क्षणात बालारफिक शेख दसरंग फिरला आणि संतोष दोरवड चितपट सापडले.
कुस्ती म्हटले की हार-जीत ही चालणारच मात्र या गोष्टीने उपस्थित कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे मात्र पारणे फेडले.