-संजय दुधाने (Twitter- @sanjaydudhane23 )
महाराष्ट्र केसरी स्पर्धा म्हणताच राज्याच्या क्रीडाक्षेत्रात नवे चैतन्य संचारते. उभा महाराष्ट्र स्पर्धेच्या तयारीला लागतो. सलग 5 दिवस चालणार्या या कुस्ती सोहळ्याचे नियोजन स्पर्धेपूर्वी दोन महिने आधीपासूनच सुरू होते. शेकडो कुस्तीसंघटक ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राबत असतात. मैदानात एकच महाराष्ट्र केसरी विजेता झालेला प्रेक्षकांना दिसत असला तरी मैदानाबाहेर असंख्य हात स्पर्धा स्मरणीय करण्यासाठी झटत असतात.
केसरी पदाची गदा जिंकणे जसे प्रतिष्ठेचे तसेच महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरविणे हाही त्या शहराचा सन्मान समजला जातो. ऑलिम्पिक स्पर्धा भरविण्यासाठी जशी आयोजक शहरांची शर्यत लागते, तशीच स्पर्धा महाराष्ट्र केसरी स्पर्धा आपल्या शहरात, गावात भरविण्यासाठी वर्षभर सुरू असते. तीन-चार आयोजक महाराष्ट्र केसरी भरविण्यासाठी उत्सुक असतात. स्पर्धा ठिकाण निवडण्याचे सर्व अधिकार महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेकडे असतात. ज्यांना खेळाची जाण आहे, कुस्तीविषयक पार्श्वभूमी आहे आणि जो आर्थिकदृष्ट्या सक्षम असतो त्यांना स्पर्धा संयोजनाची संधी मिळते.
स्पर्धा ठिकाण निश्चित झाल्यानंतर स्पर्धा खर्च अंदाजपत्रक तयार केले जाते. त्यासाठी स्पर्धेसाठी येणार्या कुस्तीगीर, संघटक आणि पाहुण्यांची संख्या लक्षात घेतली जाते.
44 तालीम संघ द 14 कुस्तीगीर – 616
44 तालीम संघ द 2 व्यवस्थापक – 88
44 तालीम संघ द 2 मार्गदर्शक – 88
तांत्रिक अधिकारी पंच – 100
पदाधिकारी – 88
नामांकित कुस्तीगीर – 20
भारतीय कुस्ती सघ निरीक्षक – 5
महाराष्ट्र ऑलिम्पिक निरीक्षक – 5
असे अंदाजे 1010 पेक्षा अधिक जणांचा स्पर्धेत सहभाग असतो. या सर्वांचा भोजन, निवास, प्रवास भत्ता, प्रवास खर्च आयोजकांना करावयाचा असतो. तसेच स्पर्धेच्या ठिकाणी 2 गादीचे 1 मातीचा आखाडा तयार करणे, 50 हजार प्रेक्षक क्षमतेसाठी गॅलरी उभारणे, पाहुण्यांसाठी भव्य व्यासपीठ, समालोचन व भाषणासाठी लाऊड स्पीकर, रात्री सामने पहाण्यासाठी विद्युत प्रकाश योजना ही कामे प्रत्यक्ष मैदानात करावी लागतात. याशिवाय कुस्तीगिरांचे टॅ्रकसुट, विजेत्या खेळाडूंचे पदके, प्रशस्तिपत्रके, स्मृतिचिन्हे, स्पर्धेच्या साहित्य, वजनकाटे, बॅटस, घड्याळे, गुणपत्रके, वैघकीय अर्ज, स्पर्धेचे जाहिराती, निमंत्रण पत्रिका, स्मरणिका, पत्रकार परिषद अशी असंख्य कामांची यादी करून त्यानुसार आयोजक समित्या तयार करतात आणि त्यानंतर सलग दीड ते दोन महिने प्रत्यक्ष कामांना सुरूवात होते.
स्पर्धेची अधिकृत घोषणा झाल्यानंतर सर्वप्रथम मैदान आणि गॅलरी उभी करण्याची लगीनघाई सुरू होते. स्पर्धेपूर्वी पंधरा दिवस आधी 2 गादी आणि 1 मातीचा आखाडा असलेले भव्य मैदान बांधले जाते. सर्वप्रथम 1 मीटर उंचीचा 150 बाय 50 फु टाचा सिमेंट कॉक्रिटचा हौदा बांधण्यात येतो. त्यात माती आणून सपाटीकरण केले जाते. यात 50 बाय 50 फू ट असे तीन आखाडे बनविले जातात. मातीवरील आखाडा तयार करण्याचे काम जिकिरीचे असते. त्यासाठी 3-4 ट्रक लाल माती आणावी लागते. ती चाळून तेल, दही, लिंब, गुलाबपाणी,काऊ असे मिश्रण करून मातीवरील आखाडा तयार केला जातो. हा आखाडा 9 मीटर व्यासाचा असतो. मॅटच्या आखाड्यासाठी कुस्ती परिषदेची मॅट वापरली जाते.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनाचे एक अंग आहे. अधिवेशनाची सुरूवात कुस्तीगिरांच्या मिरवणुकीने करण्याची प्रथा औरंगाबादच्या 1961 च्या अधिवेशनापासून सुरू झाली. राज्याच्या कानाकोपर्यातून मल्लांचे आगमन झाल्यानंतर यजमान शहराच्या मध्यवर्ती भागातून वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढली जाते. मल्लांचे स्वागत आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा या मिरवणूकीव्दारे दिल्या जातात. गेल्या दशकापासून या मिरवणूका निघत नाहीत.
कुस्ती स्पर्धेत वजनाला अत्यंत महत्त्व आहे. प्रत्यक्ष मैदानात स्पर्धा सुरू होण्यासाठी एक दिवस कुस्तीगिरांची वजने व वैद्यकीय तपासणीकरिता राखीव ठेवलेला असतो. याच दिवशी पंचांचे उजळणी शिबिर होते. संध्याकाळी सर्व संघातील मार्गदर्शकांच्या समोर चिठ्ठी व टोकन पध्दतीने स्पर्धेचा ड्रॉ काढला जातो. जिल्हा-जिल्ह्यातील मल्लांच्या लढती निश्चित होतात आणि सुरू होते चुरशीचे, अटीतटीचे रंगदार मल्लयुध्द.
महत्त्वाच्या बातम्या:
–महाराष्ट्र केसरी यशोगाथा २- कुस्तीगीरांचा कुुंभमेळ्यात डंका लालमातीचाही
–महाराष्ट्र केसरी यशोगाथा भाग १- सुरू झाले नवे कुस्तीपर्व
–महाराष्ट्र केसरीच्या मैदानातून- मोहोळ कुटुंबियाकडून सलग 35 व्या वर्षी गदेचे बक्षिस
–महाराष्ट्र केसरीचा थरार जालनात सुरू, पहा संपुर्ण वेळापत्रक...
–महाराष्ट्र केसरीच्या थेट मैदानातून- अभिजीत कटके, माऊली, गणेश, शिवराज प्रबळ दावेदार
–संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी