प्रथमच आयोजित होत असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2023 साठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (6 जून) पुणे येथे पार पडला. या लिलावात सहा फ्रेंचाईजींनी भाग घेतला. महाराष्ट्राचा अनुभवी फलंदाज नौशाद शेख हा या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. केदार जाधव कर्णधार असलेल्या कोल्हापूर टस्कर्स संघाने त्याच्यावर तब्बल सहा लाखांची बोली लावली.
पुणे येथे झालेल्या या लिलावात जवळपास सर्वच संघांची नौशाद याच्यावर नजर होती. सुरुवातीला ईगल नाशिक टायटन्स व पुणेरी बाप्पा यांनी त्याच्यावर बोली लावली. मात्र, बोली चार लाखांच्या पार गेल्यानंतर अचानकपणे कोल्हापूर स्पर्धेत उतरला. नाशिकने माघार घेतल्याने अखेरपर्यंत कोल्हापूर व पुणे यांच्या दरम्यान त्याला आपल्या संघात घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच झाली. अखेर सहा लाखांची सर्वात मोठी बोली लावत कोल्हापूर संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. विशेष म्हणजे त्याची बोली 60 हजारांच्या आधारभूत किमतीने सुरू झालेली. याचाच अर्थ त्याला त्याच्या मूळ किमतीच्या 10 पट रक्कम मिळाली.
नौशाद शेख हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये आक्रमक फटकेबाज म्हणून ओळखला जातो. जोरदार फटकेबाजी करण्यासोबतच यष्टीरक्षण व कामचलाऊ ऑफस्पिन गोलंदाजी देखील तो करू शकतो. महाराष्ट्र संघात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. 2015 मध्ये महाराष्ट्र रणजी संघासाठी पदार्पण केलेल्या नौशादने काही काळ महाराष्ट्र संघाचे नेतृत्व देखील केले आहे.
त्याच्या टी20 कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास त्याने 45 सामन्यांमध्ये 942 धावा केल्या आहेत. तसेच 12 बळी घेण्यात देखील त्याला यश आले आहे. उस्मानाबाद येथील रहिवासी असलेल्या नौशाद याने 2018-2019 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्र संघाच्या यशात मोठी भूमिका बजावली होती.
(Maharashtra Premier League Costliest Player Naushad Shaikh Story MPL 2023 Kolhapur Tuskers)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
MPL लिलावाचा थरार सुरू! पहिल्या विभागात हे खेळाडू ठरले महागडे, वाचा सविस्तर