गुवाहाटी । खेलो इंडिया युथ गेम्सच्या अखेरच्या टप्प्यात बास्केटबॉलमध्ये प्रथमच अंतिम फेरी गाठणाºया महाराष्ट्रास मुलींच्या २१ वर्षाखालील गटात रौप्यपदक मिळाले. चुरशीच्या लढतीत त्यांना केरळने ८८-६३ असे हरविले.
पूर्वार्धात केरळकडे ४३-३८ अशी आघाडी होती. महाराष्ट्राच्या तुलनेत केरळच्या खेळाडू उंच व धिप्पाड होत्या. तरीही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी त्यांना कौतुकास्पद लढत दिली. उत्तरार्धात सुरुवातीला ते केवळ दोन गुणांनीच पिछाडीवर होते. तथापि नंतर केरळच्या खेळाडूंनी तीन गुणांच्या शॉट्वर अधिक भर देत आघाडी वाढविली.
केरळकडून श्रीकला राणी हिने ३० गुण नोंदविले तर जोमा जिगो हिने २० गुण नोंदवित महत्त्वाचा वाटा उचलला. महाराष्ट्राच्या सुझानी पिंटो (१९) व श्रेया दांडेकर (१६) यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
फुटबॉलमध्ये आसामची महाराष्ट्रावर मात
फुटबॉलमधील मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. घरच्या मैदानावर व चाहत्यांच्या प्रोत्साहनाचा फायदा घेत आसामने त्यांचा ३-० असा पराभव केला.
पूर्वार्धात त्यांच्याकडे २-० अशी आघाडी होती. ३२ व्या मिनिटाला दिपू मिश्राने आसामचे खाते उघडले. पूर्वार्ध संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना उदयशंकर बोरा याने अप्रतिम फटका मारुन आसामला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात पुन्हा दिपू मिश्राने आणखी एक गोल करीत संघाची आघाडी वाढविली. त्याने ५० व्या मिनिटाला हा गोल केला. महाराष्ट्राला गोल करण्याच्या दोनतीन चांगल्या संधी मिळाल्या होत्या. मात्र त्याचा फायदा घेण्यात त्यांना अपयश आले.