जवळपास गेल्या २ वर्षापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जग हदरवून टाकले आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रात झाला, त्याला क्रीडाक्षेत्रही अपवाद ठरले नाही. अनेक स्पर्धा यामुळे रद्द झाल्या, तसेच प्रेक्षकांना मैदानापासून दूर ठेवावे लागले, तर आता खेळाडूंना बायोबबलची सवय करुन घ्यावी लागत आहे. भारतातील कबड्डी खेळावरही याचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळाला.
गेल्या वर्षभरात कबड्डीमध्ये फार काही घडत नव्हते. पण काही दिवसांपूर्वी प्रो कबड्डीच्या ८ व्या हंगामाची घोषणा झाली आणि कबड्डी प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. हा ८ वा हंगाम डिसेंबर २०२१ मध्ये सुरु होणार आहे. या हंगामासाठी मोठा लिलाव मुंबईत पार पडला. हा लिलाव २९,३० आणि ३१ असा ३ दिवस सुरु होता.
या लिलावादरम्यान अनेक आश्चर्यकारक निर्णय पाहायला मिळाले. अनेक मोठ्या आणि स्टार खेळाडूंना मोठी किंमत मिळाली, तर काही मोठ्या नावांना फ्रँचायझींनी पसंतीच दाखवली नाही. या लिलावात अनेक महाराष्ट्रीयन खेळाडूंचा देखील समावेश होता. त्यातील काही खेळाडूंना संघांनी पसंती दाखवली, तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली.
महाराष्ट्रातील स्टार कबड्डीपटू रिशांक देवाडिगा आणि गिरिश इर्नाक या खेळाडूंकडे सर्वांचेच लक्ष होते. मात्र, पहिल्या फेरीत त्यांना कोणत्याच संघाने पसंती दाखवली नव्हती. अखेर पुन्हा झालेल्या फेरीत या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या मूळ किंमतीत खरेदी करण्यात आले. तर काही काशिलिंग अडके, विशाल माने, विकास काळे असे काही खेळाडूंना कोणीही खरेदीदार मिळाला नाही.
सिद्धार्थ दुसऱ्यांदा झाला करोडपती
महाराष्ट्राचा सिद्धार्थ देसाईला या लिलावात मोठी रक्कम मिळाली. सिद्धार्थला तेलगु टायटन्सने एफबीएम कार्डचा वापर करत संघात कायम केले आहे. त्याला संघात घेण्यासाठी लिलावादरम्यान युपी योद्धा आणि पटना पायरेट्समध्ये चढाओढ सुरु होती. अखेर युपी योद्धाने १ कोटी ३० लाखांच्या किंमतीत बोली जिंकली. मात्र, त्याचवेळी तेलगु टायटन्सने एफबीएम कार्डचा वापर केला आणि सिद्धार्थला १ कोटी ३० लाखांच्या किंमतीत आपल्या संघात कायम केले.
त्याला मागील हंगामादरम्यान तेलुगु टायटन्सने १ कोटी ४५ लाख रुपये देत संघात स्थान दिले होते.
प्रो कबड्डीच्या लिलावात महाराष्ट्रातील या खेळाडूंवर लागली बोली
सिद्धार्थ देसाई – १ कोटी ३० लाख – तेलुगु टायटन्स
श्रीकांत जाधव – ७२ लाख – युपी योद्धा
जीबी मोरे – २५ लाख बंगळुरु बुल्स
रिशांक देवाडिगा – २० लाख – बेंगाल वॉरियर्स
गिरिश इर्नाक – २० लाख – गुजरात जायंट्स
सुशांत सैल – १० लाख – दबंग दिल्ली
सौरभ पाटील – १५ लाख – तमिळ थलायवाज
सुनील सिद्धगवळी – १० लाख – यु मुम्बा
ऋतुराज कोरावी – १९.८० लाख – तेलुगु टायटन्स
मयुर कदम – १६ लाख – बंगळुरु बुल्स
रोहित बने – १० लाख – बेंगाल वॉरियर्स
महेंद्र राजपूत – १५ लाख – गुजरात जायंट्स
आकाश पिकाळमुंडे – १७ लाख – बेंगाल वॉरियर्स
शुभम शिंगे – १० लाख – पटना पायरेट्स
अजिंक्य पवार – १९.५० लाख – तमिळ थलायवाज
महत्त्वाच्या बातम्या –
अखेर गिरीश इर्नाक आणि रिशांक देवडिगाला खरेदीदार मिळाला, ‘या’ संघात झाले सामील