पुणे: गेल्याच आठवड्यात सणस मैदान पुणे येथे हिंद केसरी कुस्ती स्पर्धेच्या केलेल्या यशस्वी आयोजननानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आजपासून राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचे त्याच मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा कालावधी गुरुवार दिनांक ११ मे ते रविवार दिनांक १४ मे हा आहे.
ही स्पर्धा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत पुणे, कोल्हापूर, नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, ठाणे, सातारा येथील संघ सहभागी होत आहेत. त्यात पुरुष व महिला संघ असे मिळून ३५ संघ सहभागी होत आहे.
स्पर्धेसाठी भरघोस पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. त्यात पुरुष आणि महिला गटातील विजेत्या संघाला प्रत्येकी एक लाख ५१ हजार रुपये आणि करंडक, तर उपविजेत्या संघाला एक लाख २५ हजार रुपये आणि करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकूण बक्षिसांची रक्कम १० लाख २२ हजार आहे.
पत्रकार परिषदेला हेमंत रासने, बाबूराव चांदोरे, शांताराम जाधव आणि महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.