वडोदरा | महाराष्ट्राच्या टेबल टेनिस खेळाडूंनी इलेव्हन स्पोर्ट्स 64 व्या राष्ट्रीय स्कूल गेम्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या 19 वर्षाखालील व 17 वर्षाखालील मुलींच्या सांघिक गटाच्या बाद फेरीत धडक मारली. समा इनडोअर क्रीडा संकुल येथे बुधवारी दुपारी सामने झाले.
महाराष्ट्राच्या 19 वर्षाखालील मुलांच्या सांघिक संघाने अ गटात आघाडी घेतली.त्यांनी पहिल्या सामन्यात केंद्रीय विद्यालय संघटन संघाला 3-0 असे तर, हिमाचल प्रदेशला देखील त्यांनी याच फरकाने नमविले.
त्यांना आसामविरुद्ध चांगलाच घाम गाळावा लागला.विपुल व्यंकटेशने महाराष्ट्राला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर विपुलचा सहकारी गौरव दिनेशला आसामच्या अंकिता सहारिआकडून 1-3 असे पराभूत व्हावे लागले व सामना बरोबरीत आणला. महाराष्ट्राच्या जितेंद्र रामस्रीजन याने विजय मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली. विपुलने आपला दुसरा सामना जिंकत संघाला बाद फेरीत स्थान मिळवून दिले.
17 वर्षाखालील मुलींच्या संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात मणिपूर संघाला 3-0 अशा फरकाने पराभूत केले. दुस-या सामन्यामध्ये त्याने केरळला 3-1 असे नमविले तर, ओडीशा संघावर त्यांनी 3-0 असा विजय नोंदवत आगेकूच केली.