महाराष्ट्राच्या मातीतील खेळ म्हणून कुस्तीकडे पाहिले जाते. वाड्या-वस्त्यापासून मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरांमध्ये देखील कुस्ती शौकीन आणि पैलवानांचा कोठेही दुष्काळ पाहायला मिळत नाही. राजर्षी शाहू महाराजांनी राजाश्रय दिलेली लाल मातीतील कुस्ती आता मॅटवर पोहोचली आहे. मात्र, आजही ग्रामीण भागात लाल मातीत शड्डू ठोकणाऱ्या निधड्या छातीच्या पैलवानांना पाहून ‘भले शाब्बास’ म्हणणारे जुनेजाणते कुस्तीशौकीन हजारोंच्या संख्येने पाहायला मिळतील.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वातावरणात गावोगावी भरणार्या यात्रा-जत्रामध्ये पुन्हा एकदा हेच लाल मातीतील अस्सल रांगडे वाघ आता पुन्हा दिसू लागले आहेत. जवळपास दोन वर्षांपासून जगावर असलेले कोरोनाचे संकट आता काहीसे दूर गेले आहे. शासन निर्णयामूळे मागील दोन वर्षात अगदी अभावाने कुस्ती लोकांना पाहायला मिळाली. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र केसरीसारखी प्रतिष्ठित स्पर्धा देखील खेळली गेली नाही. गर्दीवर बंधने असल्याने गावागावात भरणारे यात्रा उरुस बंद होते. या सर्वाचा तोटा पैलवानांना सहन करावा लागला.
राज्याच्या कानाकोपऱ्यातील बहुसंख्य पैलवान हे छोट्या-मोठ्या कुस्त्या खेळून आपल्या खुराकाचा खर्च भागवत असतात. मात्र, कोरोनामूळे त्यांच्या या कमाईवर गदा आली होती. याच दरम्यान अनेक पैलवान खुराकासाठी अत्यंत तुटपुंजा रकमेसाठी पडेल ते काम करण्याची तयारी दर्शवत होते. याच दरम्यान काही पैलवानांनी चक्क कुस्ती सोडून इतर कामे करण्यासही सुरुवात केली होती.
मार्च-एप्रिल या महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश गावांमध्ये कुस्त्यांचे फड रंगत असतात. यात्रेच्या निमित्ताने लाखांची बक्षीस देखील काही गावांमध्ये पैलवानांवर लावली जातात. या वर्षी शिवजयंतीच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी जंगी कुस्ती सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. एकप्रकारे ही या नव्या हंगामाची नांदी ठरली. राज्यभरातील नामवंत पैलवान वेगवेगळ्या आखाड्यामध्ये झुंजताना दिसले. पुढील दोन-तीन महिन्यात पैलवानांना गावोगावी जाऊन आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. कुस्तीसाठी जीवन अर्पण केलेल्या खेळाडूंमध्ये या नव्या हंगामाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुन्हा एकदा नव्याने ‘चांगभलं’ म्हणत लाल मातीत समोरच्या पैलवानला आसमान दाखवण्यासाठी आता पैलवान शड्डू ठोकून तयार झालेत.