श्रमिक जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत काल दुसऱ्यादिवशी साखळी सामने खेळवण्यात आले. पुरुष गटात १५ तर महिला गटात १२ संघांनी सहभाग घेतला आहे.
महिला विभाग महात्मा गांधी स्पो, डॉ शिरोडकर, स्वराज्य स्पो, राजमाता जिजाऊ, शिवशक्ती, शिवतेज, सुवर्णयुग, जय हनुमान बाचणी संघाचा बादफेरीत प्रवेश. पुरुष विभागात महिंद्रा, मुंबई बंदर, देना बँक, मध्य रेल्वे, मुंबई पोलीस, न्यु इंडिया इन्शुरन्स, एयर इंडिया, युनियन बँक, जे जे हॉस्पिटल, बी ई जी पुणे संघानी बादफेरीत प्रवेश मिळवला.
महिला विभागात अ गटात महात्मा गांधी स्पो. विरुद्ध अमर हिंद यांच्यात लढत झाली. सुरुवातीला संथ सुरुवात करणाऱ्या महात्मा स्पो. संघाने नंतर आक्रमक पवित्रा घेत सामन्यावर मजबूत पकडी मिळवली. सायली जाधव, मीनल जाधव व तेजस्वी पाटेकर यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर महात्मा गांधी स्पो. ने ३६-१५ असा विजय मिळवला.
शिवशक्ती विरुद्ध स्वराज्य स्पो. यांच्यात शिवशक्ती संघाने ५४-१४ असा एक हाती मिळवत गटातील दोन्ही सामने जिंकत बादफेरीत प्रवेश मिळवला. स्वराज्य स्पो. ने गटातील १ सामना जिंकत बादफेरीत प्रवेश मिळवला. कोल्हापूरच्या जय हनुमान बाचणी संघाने ३९-१९ असा संघर्ष संघचा पराभव करत स्पर्धेत उत्कृष्ट खेळ केला. व दोन्ही सामने जिंकत बादफेरीत प्रवेश मिळवला.
सुवर्णयुग पुणे विरुद्ध महात्मा गांधी स्पो यांच्यात चुरशीची लढत झाली. मध्यंतरा पर्यत १६-१० अशी आघाडी असणाऱ्या सुवर्णयुग संघाला आपली आघाडी जास्त वेळ टिकवता आली नाही. शेवटच्या क्षणी महात्मा गांधी संघाने २९-२६ असा विजय मिळवत बादफेरीत प्रवेश मिळवला.
पुरुष विभागात जे.जे. हॉस्पिटल विरुद्ध रिझर्व्ह बँक यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळाली. मध्यंतरा पर्यत १५-१७ असा पिछाडीवर असणाऱ्या जे.जे. हॉस्पिटलने ३५-३३ असा विजय मिळवला. जे.जे. हॉस्पिटल कडून नवीन पहाल व प्रवीण जाधव यांनी चांगला खेळ केला. बी.ई.जी पुणे संघाने ठाणे पोलीस संघाचा ४८-१७ असा पराभव केला.
एयर इंडिया विरुद्ध सेंट्रल बँक यांच्यातील सामना एयर इंडियाने २०-०७ असा जिंकला. मोसमातील ४ विजेतेपद पटकवणाऱ्या एयर इंडियाला मुंबई बंदर संघाने २७-२२ असे नमवले. मोसमातील हा एयर इंडियाचा दुसराच पराभव होता. महिंद्रा अँड महिंद्राने न्यु इंडिया इन्शुरन्स संघाचा ३९-१६ असा पराभव केला. तर मुंबई पोलीस संघाने ठाणे पोलीस वर २०-०९ अशी मात दिली.