जगातील अनेक माजी अनुभवी खेळाडू भारतीय संघाचे प्रशिक्षक बनण्याचे स्वप्न पाहत असतात, कारण जगातल्या ताकदवान क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद मिळणे ही मोठी बाब असते. पण श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेने बीसीसीआयचा हा प्रस्ताव नाकारला आहे. खुद्द बीसीसीआयनेच हा प्रस्ताव त्याला दिला होता.
सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक माजी भारतीय अष्टपैलू रवी शास्त्री आहेत, ज्यांचा कार्यकाळ आगामी टी२० विश्वचषक २०२१ नंतर संपत आहे. शास्त्री यांनी यापूर्वीच म्हटले आहे की, ते भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारणार नाहीत. दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली क्रिकेट मंडळ बीसीसीआयने नवीन प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे.
चर्चेत भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे नावही पुन्हा एकदा समोर आले आहे. मात्र, कुंबळे हे पद पुन्हा स्वीकारतील की नाही, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यांनी २०१७ मध्ये पहिल्या कार्यकाळातून राजीनामा दिला होता. त्यावेळी कुंबळे आणि विराट कोहली यांच्यात मतभेद झाले होते.
एका अहवालानुसार, कुंबळे यांच्याशी संपर्क साधण्यापूर्वी बीसीसीआयने या पदासाठी श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज महेला जयवर्धने यांच्याशी संपर्क साधला होता. बीसीसीआयला जयवर्धनेला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करायचे होते, पण त्याने ही ऑफर नाकारली आहे.
जयवर्धनेला सध्या श्रीलंका संघाचे प्रशिक्षक व्हायचे आहे, अशा सध्या चर्चा आहेत. याशिवाय, जर त्याने भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले असते, तर त्याला मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक पद सोडावे लागले असते. कारण बीसीसीआयच्या नवीन नियमानुसार, जर एखादी व्यक्ती बीसीसीआयमध्ये एका पदावर असेल, तर ती दुसरे पद घेऊ शकत नाही. जयवर्धने हा त्याच्या काळातील एक महान फलंदाज आहे.
त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १४९ कसोटी, ४४८ एकदिवसीय आणि ५५ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जयवर्धनेने कसोटीत ११८१४ धावा, एकदिवसीय सामन्यात १२,६५० धावा, तर टी -२० मध्ये १४९३ धावा केल्या आहेत. या फलंदाजाच्या खात्यात एकूण ५४ आंतरराष्ट्रीय शतके आहेत, ज्यात ७ द्विशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषकासाठी संघ निवडताना राहुल द्रविडची मदत घेणार निवड समितीचे नवीन चेअरमन, ‘हे’ आहे कारण
जेव्हा केवळ २ धावांवर बाद होऊनही गांगुलीने जिंकलेला ‘सामनावीर’ पुरस्कार, पाकिस्तानची उडवली होती झोप
दहशतवादी हल्ल्यांमुळे क्रिकेटवर परिणाम झाल्याच्या ५ घटना; पाकिस्तान राहिलाय केंद्रबिंदू