पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या स्टार बॅडमिंटन जोडीला धक्का! दुसऱ्या फेरीचा सामना अचानक रद्द

अव्वल भारतीय बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. या जोडीचा पुढील सामना रद्द करण्यात आलाय.
बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या पहिल्या सामन्यात सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी कोर्वी लुकास आणि लेबर रोनन या फ्रेंच जोडीवर 21-17, 21-14 असा शानदार विजय नोंदवला होता. या विजयानंतर भारतीय जोडीकडून पदकाच्या आशा वाढल्या आहेत. मात्र आता त्यांचा दुसरा सामना रद्द करण्यात आलाय.
27 जुलै रोजी पहिला सामना जिंकल्यानंतर, रँकीरेड्डी आणि शेट्टी या जोडीला आज म्हणजेच 29 जुलै, सोमवारी मार्विन सीडेल आणि मार्क लॅम्सफूस या जर्मन जोडीविरुद्ध पुढील सामना खेळायचा होता. हा सामना दुपारी 12 वाजल्यापासून होणार होता, मात्र तो रद्द करण्यात आला आहे. हा सामना रद्द का करण्यात आला, हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
वास्तविक, जर्मनीच्या मार्क लॅम्सफूसनं गुडघ्याच्या दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघानं मार्क लॅम्सफूसनं नाव मागे घेतल्याची माहिती दिली आहे. लॅम्सफूसच्या दुखापतीमुळे जर्मन जोडीचे पुढील दोन सामनेही रद्द झाले. सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या क गटात आहे.
पहिल्या सामन्यात नेत्रदीपक विजयाची नोंद करणाऱ्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला आणखी दोन सामने खेळायचे होते, मात्र दुसरा सामना रद्द झाल्यामुळे भारतीय जोडी आता एकच सामना खेळणार आहे. पदकाच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी सात्विकसाईराज आणि चिराग यांना शेवटच्या सामन्यात विजय नोंदवावाच लागेल. ही जोडी आता त्यांचा पुढील आणि शेवटचा सामना मंगळवार, 30 जुलै रोजी इंडोनेशियाच्या अल्फियान फजर आणि अर्दियांतो मुहम्मद रियान याच्याविरुद्ध खेळेल.
हेही वाचा –
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासोबत अन्याय, बॅडमिंटनपटूचा विजय ठरला अवैध! कारण जाणून बसेल धक्का
मनू भाकरच्या कांस्यासह भारताची पदकतालिकेत एंट्री, आज मिळू शकतात आणखी 3 गोल्ड मेडल!
यशस्वीचा धमाका, बिश्नोईच्या फिरकीची जादू….भारतानं श्रीलंकेविरुद्धची मालिका सहज खिशात घातली