आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघात महत्त्वाचा बदल केला आहे. फ्रँच्याईजीनं श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेवर मोठी जबाबदारी सोपवली. जयवर्धनेला मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलं आहे. तो संघात मार्क बाउचरची जागा घेईल. जयवर्धनेनं 2017 ते 2022 पर्यंत मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. आता त्याला पुन्हा ही जबाबदारी मिळाली आहे. 2023 आणि 2024 मध्ये मार्क बाउचर मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक होते. मात्र आता त्यांची जागा जयवर्धने घेणार आहे.
महेला जयवर्धनेचा प्रशिक्षक म्हणून चांगला रेकॉर्ड आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबईनं तीन विजेतेपद पटकावले. मुंबईनं 2017, 2019 आणि 2020 मध्ये जयवर्धनेच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. 2022 मध्ये मुंबईनं जयवर्धनेकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. त्याला क्रिकेटचं ग्लोबल हेड बनवण्यात आलं होतं. या काळात त्यानं महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची मदत केली होती.
आयपीएल 2024 मुंबईसाठी खूप वाईट राहिलं. संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानी राहिला होता. मुंबईनं आयपीएल 2024 मध्ये एकूण 14 सामने खेळले, ज्यापैकी संघ केवळ 4 सामने जिंकू शकला. मुंबईला 10 सामन्यांत पराभवाला सामोरं जावं लागलं. मुंबईत अनेक मोठे खेळाडू होते. पण तरीही संघ प्लेऑफसाठी पात्र करू शकला नव्हता.
मुंबईच्या खराब हंगामाची सुरुवात मिनी ऑक्शनपासूनच झाली होती. संघानं सर्वप्रथम रोहित शर्माला पदावरून हटवलं. रोहित हा मुंबईचा यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबईनं 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. मात्र संघानं त्याला कोणतीही माहिती न देता पदावरून हटवलं.
रोहितच्या जागी हार्दिक पांड्याकडे कमान सोपवण्यात आली. त्यावेळी हार्दिक त्याच्या वैयक्तिक आयुष्यात झगडत होता. तो पत्नीसोबत वेगळा झाला, ज्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवरही दिसून आला. यामुळे रोहित आणि पांड्याचे चाहते सोशल मीडियावर एकमेकांशी भिडले. आता जयवर्धनेवर संघाला या सर्व परिस्थितीतून बाहेर काढण्याची जबाबदारी आहे. तो ही जबाबदारी किती योग्यपणे निभावू शकतो, हे पाहणं आता महत्वाचं असेल.
हेही वाचा –
बाबर-शाहीनची हकालपट्टी! इंग्लंड विरुद्धच्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर
आयपीएल मेगा लिलावाबाबत मोठी अपडेट! या सुंदर शहरात होऊ शकतं लिलावाचं आयोजन
या रणजी खेळाडूंना लवकरच मिळू शकते टीम इंडियामध्ये जागा, एकाचं स्थान जवळपास पक्कं!