---Advertisement---

कोच असावा तर असा! मुंबईच्या रोमहर्षक विजयानंतर जयवर्धनेच्या प्रेरणादायी भाषणाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

On: बुधवार, एप्रिल 14, 2021 8:10 PM
---Advertisement---

जगातील सर्वात प्रसिद्ध व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएल २०२१ मधील पाचवा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने १५३ धावांचा बचाव करताना १० धावांनी रोमहर्षक विजय साजरा केला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धनेने आपल्या संघासमोर प्रेरणादायी भाषण केले.

जयवर्धनेचे प्रेरणादायी भाषण
चेन्नई येथे झालेल्या या सामन्याचे पारडे वारंवार झुकत राहिले. अखेरीस विजय कोलकाता नाईट रायडर्सच्या टप्प्यात होता. मात्र, मुंबईच्या अनुभवी गोलंदाजांनी अखेरच्या ५ षटकात कोलकात्याच्या फलंदाजांना ३१ धावा बनवू दिल्या नाहीत व १० धावांनी संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षण माहेला जयवर्धनेने ड्रेसिंग रूममध्ये आपल्या खेळाडूंना संबोधित केले. जयवर्धने म्हणाला, “तुम्ही सर्वजण संघासाठी थोडेथोडे योगदान देत आहात. आपल्याला एकत्र येण्याची आणि ध्येय पूर्ण करण्याची गरज आहे. आपण या सामन्यात मोठा अनुभव घेतला. आपण सामन्यात टिकून राहिलो आणि अखेरीस यश मिळाले. आपल्यात गुणवत्ता आहे. ही केवळ हंगामाची सुरुवात आहे. आपल्याला परिस्थिती पाहून अशी कामगिरी करावी लागेल.”

जयवर्धने २०१९ पासून मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याच्याच नेतृत्वात मुंबईने सलग दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावे केले.

मुंबईने मिळविला अटीतटीच्या सामन्यात विजय
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने अफलातून मुसंडी मारत विजय मिळवला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने निर्धारित १५२ धावा धावफलकावर लावल्या. कोलकातासाठी अष्टपैलू आंद्रे रसेलने १५ धावांत ५ बळी आपल्या नावे केले.

प्रत्युत्तरात, कोलकताला शुबमन गिल व नितीश राणा यांनी अर्धशतकी सलामी दिली. मात्र, युवा फिरकीपटू राहुल चहरने २७ धावांत चार गडी बाद करत सामना रंगतदार बनवला. अखेरच्या ५ षटकात ३१ धावा हव्या असताना कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांनी किफायतशीर गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबई म्हणजे आयपीएलची अंडरटेकर; केकेआरविरुद्धच्या विजयानंतर सेहवागने शेअर केला ‘हा’ खास व्हिडिओ

‘हे’ तीन खेळाडू राजस्थान रॉयल्स संघात घेऊ शकतात दुखापतग्रस्त बेन स्टोक्सची जागा

नवरोबांची फटकेबाजी पाहून नताशा, रितीका अन् पंखुडीची भन्नाट रिऍक्शन, तोंड राहिले खुलेच्या खुले; बघा फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---