-शरद बोदगे (महा स्पोर्ट्स)
“चिंटू सर, ये बॅट तो बहोत हलकी हैं, तुटेगी?” एक टेनिस बॉलवर क्रिकेट खेळणारा ३०-३५ वयाचा व्यक्ती आवाज देतो. तेवढ्याच जबाबदारीने आणि खात्रीने परत आवाज येतो, “सर, आप टेन्शन मत लो, कूछ नाही होगा. मैं हू ना!” हा आवाज दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून त्या व्यक्तीचा आहे जो भारताच्या आजी- माजी कर्णधारांची बॅट दुरुस्त करून देतो.
वय- २५ वर्ष, नाव- महेश रणसुभे, आवडता छंद- क्रिकेट खेळणे आणि बॅट दुरुस्ती! पुण्यातील गल्ली बोळ पार करत आपण शुक्रवार पेठेत जेव्हा जातो तेव्हा शिंदे आळीतील एका छोटेखानी शॉपमध्ये महेश रणसुभे उर्फ चिंटूच दुरुस्तीला आलेल्या आणि नव्या बॅटने खचाखच भरलेलं दुकान. त्यात अगदी महाराष्ट्राच्या रणजीपटूपासून ते इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटच्या बॅटचा समावेश.
एक २५ वर्षांचा मुलगा जेव्हा सांगतो की, मी धोनी, कोहलीची बॅट दुरुस्त करतो तर एकतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात. हा मुलगा एकतर खोट बोलतोय किंवा हे जर खरं असेल तर याचा प्रवास इतका झटपट कसा झाला. परंतु गहुंजे मैदानावरील त्याचे आणि धोनीचे तसेच ज्यो रूट बरोबरील बॅटची छायाचित्र पाहून पहिला पर्याय हा ओघानेच संपवून मी दुसऱ्या पर्यायाला हात घातला. मग कसा झाला महेश हा प्रवास सुरु असं विचारताच महेश त्याच्या ह्या प्रवासाबद्दल भरभरून बोलतो .
“आपला आणि अभ्यासाचा पहिल्यापासून छत्तीसचा आकडा! ११वी -१२वी सिम्बाओसीसी आणि नंतर बी-कॉम सिंहगड कॉलेजमधून कसबस केलं. आपलं मन रमत क्रिकेट खेळण्यात! तीच आपली पहिली आवड. त्यामुळे मी पहिल्यापासून विविध स्तरावरील क्रिकेट खेळत आलो आहे. परंतु घरगुती कारणांमुळे आर्थिक अडचणी आल्या आणि त्याचा सरळ परिणाम माझ्या खेळावर होऊ लागला. म्हणून मी क्रिकेट बॅट दुरुस्त करण्याचा व्यवसाय निवडला. तशी मला याची पहिल्यापासून आवड होतीच.” महेश हळूहळू गोष्टी उलगडत जातो.
मग हे धोनी भाई, विराट मध्येच कुठे आले तुझ्या स्टोरीमध्ये?? मी त्याची लय तोडत हे कोहली धोनी बॅट दुरुस्ती प्रकरण काय आहे असं विचारताच राहुल द्रविडप्रमाणे माझ्या अचानक आलेल्या यॉर्कर लेंथ चेंडूला तो हळुवार स्ट्रेट ड्राईव्हने उत्तर देतो. ” सर हे केदार जाधवमुळे शक्य झालं. इंग्लंडची टीम पुण्यामध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी जानेवारी महिन्यात आली होती. तेव्हा धोनी आणि कोहलीला केदारने बॅटच काम करणारा असा कुणीतरी मुलगा पुण्यात असल्याचं कळवलं. त्यामुळे त्यांनी मला गहुंजेच्या मैदानावर बोलवलं. दुरुस्तीसाठी लागणार सर्व साहित्य घेऊन मी जेव्हा तिकडे गेलो तर मला प्रत्यक्षात एमएस धोनी आणि विराटच्या बॅटवर काम करायची संधी मिळावी. तो माझ्यासाठी पहिलाच एवढा मोठा अनुभव होता. दडपणही होते. त्यापूर्वी मी केदारच्या बॅटवर अनेक वेळा काम केले होते. हि बातमी जेव्हा ज्यो रूटला समजली तेव्हा त्यानेही माझ्याकडून त्याच्या बॅटच काम करून घेतलं”
ते देशासाठी खेळतात, मी त्यांच्याकडून कसा पैसा घेईल
माझ्या पुढील प्रश्नावर महेश काहीसा भावनिक होऊन उत्तर देतो. “तुला धोनी किंवा कोहलीने ह्या कामाचा मोबदला दिला का?” “ते मोबदला देत होते, मीच नाही घेतला. धोनी तर मला त्या कामासाठी ५००० रुपये देत होता. मी नाही घेतले. ते आपल्या देशासाठी खेळतात. त्यांच्याकडून मी पैसे कसे घेईल आणि शेवटी मीही एक खेळाडू आहे. त्यामुळे मी शक्यतो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून पैसे नाही घेत. ज्यो रूटने मला ग्लोव्हज तर बेन स्ट्रोकने ३००० हजार रुपये दिले. मी त्या एकदिवसीय सामन्यापूर्वी धोनीच्या ४ बॅट पकडून अंदाजे १२ बॅट दुरुस्त केल्या!”
धोनी भाईंना आवडते गोल आकाराची बॅट…
” साधारणपणे बॅटचा आकार ह्या खालच्या बाजूला चौकोनी असतो. धोनी भाईंनी मला त्यांची बॅट खालच्या बाजूने गोल करण्यास सांगितली. त्यांना बॅट गोल असलेली आवडते. परंतु असे का? हा प्रश्न तेव्हा त्यांना नाही विचारला.”
तुझ्या बॅटमुळे स्ट्रोक, धोनी ही कमाल करतो असं म्हटल्यावर महेश त्याला नम्रपणे नकार देत म्हणतो,” धोनी भाई मोठे खेळाडू आहेत. ते स्टंपनेही षटकार मारू शकतात. माझा त्यात काहीही वाटा नाही.”
आयपीएलच्या वेळी राहुल त्रिपाठी या महाराष्ट्राच्या रणजीपटूमुळे मी भरपूर आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बॅट दुरुस्त करून दिल्याचं महेश आवर्जून सांगतो. अगदी आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू असणाऱ्या बेन स्ट्रोकची बॅटही महेशने दुरुस्त केली आहे. राहुलमुळे भरपूर खेळाडूंशी ओळखी झाल्याच आणि त्यांची काम करायची संधी मिळाल्याचं महेश बोलतो.
तू कोणत्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बॅट दुरुस्त केल्या आहेत असं विचारलं असता महेश बराच आठवून एक एक नाव घेतो. त्यात ज्यो रूट, बेन स्ट्रोक, केदार जाधव, एमएस धोनी, विराट कोहली, रवींद्र जडेजा, मनोज तिवारी, फाफ डुप्लेसी यांच्यातर बॅटची कामे केलीच आहे परंतु गोलंदाज असलेल्या उमेश यादव, ईश्वर पांडे यांच्याही बॅटचा त्यात समावेश आहे.
बॅट खरेदीसाठी खास मुंबईवरून आलेला महाराष्ट्राकडून रणजी खेळत असलेला कोल्हापूरचा विशांत मोरे म्हणतो, “मी इथे पहिल्यांदाच आलो आहे. परंतु महेशबद्दल भरपूर ऐकलं आहे. बऱ्याच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटरकडून त्याच्याबद्दल ऐकल्यामुळेच मी इथे आलो आहे. महेश छान काम करतोय!”
महेशला त्याच्या स्वप्नाबद्दल विचारले असता तो निवांतपणे सांगतो, “मला यातच पुढे करिअर करायचं आहे परंतु त्याचबरोबर मला एक चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. माझी क्रिकेट करिअरबद्दलची खूप स्वप्ने नक्कीच नाहीत. मी रणजी अथवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची स्वप्ने पहात नाही परंतु मला एक चांगलं क्रिकेट जे मला समाधान देईल ते खेळायला नक्की आवडेल. हा क्रिकेटचा मोसम असल्यामुळे मी गेले ३ महिने बॅटही हातात घेतली नाही.”
“राहुल द्रविड मला फार आवडतो. ४-५ वर्षांपूर्वी त्याला राजस्थान पुणे सामन्यापूर्वी नेटमध्ये गोलंदाजी करायची संधी मिळाली होती, परंतु ओळख नव्हती. आता ते क्रिकेट खेळत नाही. म्हणून त्यांची बॅट दुरुस्तीला येण्याचा प्रश्नच नाही. बॅट दुरुस्तीला आली तर खेळाडूंबरोबर बऱ्यापैकी ओळख होते. द्रविड बरोबर अशी ओळख बनवण्याची संधी हुकली!” द्रविडचा आणखी एक मोठा भक्त ही खंत व्यक्त करतो.
महेश पुण्याजवळील दापोडीमध्ये रहातो. त्याचा हा दिनक्रम अंदाजे ११ वाजता सुरु होतो. दापोडी ते शॉप हे अंतर अंदाजे १५किलोमीटर असेल. “मी रोज ११ वाजता दुकान सुरु करतो. ११ ते २:३० पर्यंत काम करतो. दुपारी ४ ते रात्री ९:३० माझं काम सुरु असत. दुपारी काम झाल्यावर मी २ तास विश्रांती घेतो. कारण दिवसभर काम करून पाठीवर चांगलाच ताण येतो. जर मी विश्रांती घेतली नाही तर मी संध्याकाळी काम करू शकत नाही आणि मी काम केले नाही तर मला पुन्हा माझे छंद जोपासता येणार नाही. ” महेश मधील एक जागृत क्रिकेटर बोलतो.
https://youtu.be/NhEu04ET94Q