-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund)
धोनी आला तो मिडास टच घेऊनच. २००७ च्या विश्वचषकात भारताने सपाटून मार खाल्ला होता.अशात त्यानंतर लगेचच होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी सगळे ज्येष्ठ खेळाडू स्वतःहून बाहेर झाले आणि धोनीकडे संघाची धुरा सोपवण्यात आली. त्यानेही भारताला टी२० चा हा विश्वचषक जिंकून दिला. तिथून सुरू झालेले धोनीपर्व आजही सुरू आहे.
दरम्यान त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ चा विश्वचषक, २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. २०१५ च्या विश्वचषकातही भारताने सगळे साखळी सामने जिंकले. विक्रमांचीच चर्चा करायची झाली तर धोनीच्या नावे अनेकानेक विक्रम आहेत. धोनी भारताचा आजवरचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार ठरला आहे.
कर्णधारपद सोडल्यावर त्याने खेळावे की नाही? अशा चर्चा सुरू झाल्या. त्याला कारणही तसेच होते. एकेकाळी भारताला एकहाती विजय मिळवून देणाऱ्या धोनीला आता ते करणे शक्य होत नव्हते,होत नाही.जे फिनिशिंग धोनीचा ट्रेडमार्क होते तेच त्याला जमत नाहीये. तरीही त्याची संघात राहण्याची इच्छा कायम आहे.अनेकदा संघाबाहेर गेल्यावर पुन्हा संघात येताना धोनीला कुठलाही निकष लावल्याचे दिसले नाही.तेंडुलकरसारखे महान खेळाडू देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळून आपला फिटनेस, आपली योग्यता सिद्ध करायचे. धोनी मात्र कधीही असे करताना दिसला नाही. माझ्यासाठी एखाद्या नवोदित खेळाडुची जागा अडायला नको असे म्हणणारा धोनी भारतीय संघात मात्र नवोदित खेळाडूंसाठी जागा रिकामी करून देताना दिसत नाही.
वेळप्रसंगी ज्येष्ठ खेळाडूंना त्यांच्या हालचाली मंदावल्या म्हणून त्याने संघाबाहेर ठेवले.आता मात्र स्वतःवर असा प्रसंग आल्यावर तो तसे करताना दिसला नाही. यष्टीरक्षक म्हणून उत्तम कामगिरी केलेला धोनी फलंदाज म्हणून तितकाच कमी पडत चालला आहे.ज्या धोनीच्या स्त्राईक रेटची सतत चर्चा होते त्याच धोनीचा हाच स्त्राईक रेट गेल्या तीन वर्षांत भारत जेव्हा जेव्हा हरला तेव्हा फक्त ५५ एवढा तर धावांची सरासरी २६ एवढी आहे. गेल्या दोन वर्षांत हेच आकडे ६३ आणि ४० असे आहेत.गेल्या एक वर्षात त्याचा स्त्राईक रेट ७६ तर सरासरी ३९.९४ ची आहे. मग कधीतरी माही एखादी खेळी खेळून जातो आणि त्याचे चाहते ‘माही मार रहा है’ म्हणण्यात धन्यता मानतात. पण जेव्हा गरज असेल तेव्हा माहीने मारलं पाहिजे रे. सध्या मात्र तो फक्त ढकलत खेळतोय असे वाटते. ‘माही मार रहा है’ ऐवजी ‘माही ढकल रहा है’ असे म्हणावेसे वाटते.
असे असतानाही धोनी आज विश्वचषक खेळणाऱ्या संघात आहे ते फक्त आणि फक्त त्याच्या आधीच्या पुण्याईवर. हाच निकष लावायचा तर इतरही अनेक खेळाडूंना संधी मिळायला पाहिजे होती.मात्र तसे झाले नाही.एक यष्टीरक्षक म्हणून त्याची कामगिरी वादातीत असली तरी फलंदाजीत मात्र त्याला स्वतःच्या लौकिकाला साजेशी अशी कामगिरी करता आलेली नाही.परवाच्या सामन्यातही ते दिसून आले.मग त्याला फक्त यष्टीरक्षक म्हणून संघात घेतले का? असाही प्रश्न येतो. नवोदितांना संधी द्या असे म्हणताना पंत सारख्या नवोदिताची संधी मात्र हिरावून घेतली गेली. धवनला दुखापत झाली म्हणून त्याला संधी मिळाली हे वेगळे. इथेही पंत मिळालेल्या संधीचा असा कितपत फायदा उठवतोय असा युक्तिवाद काहीजण करतात. अरे मग धोनी तरी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला कुठे अगदी संपूर्ण पॅकेज होता? तोही कालानुरूपच सुधारला ना. मग पंतही सुधरेल की.
अनेकदा धोनी मैदानावर गोलंदाजांना, अगदी कोहलीला सुद्धा सल्ला देताना दिसतो. त्यानंतर फलंदाज बाद झाला तर त्याचे श्रेय मात्र धोनीला जाते. धोनीच जर गोलंदाजांना बळी मिळवण्यासाठी मदत करत असेल तर भारताने सामने हारायलाच नको. त्यामुळे प्रत्येक वेळी धोनीच मास्टरमाइंड असतो ही थोडी अतिशयोक्ती वाटते.
एवढे सगळे असताना धोनीवर त्याचे चाहते मात्र जीवापाड प्रेम करतात. मात्र हे प्रेम कधीकधी अति होते. धोनीवर जराशी टीका केली तरी त्याचे चाहते आक्रमक होतात. सध्या तर ट्रोल करणे फार सोपे आहे. धोनीच्या टीकाकारांना अनेकदा ट्रोल केले गेले, अजूनही केले जाते. अगदी याच पोस्टलाही अनेकजण ट्रोल करतील.मात्र याच धोनी समर्थकांना जेव्हा त्याची आकडेवारी दिली जाते तेव्हा मात्र ते एकतर गप्प बसतात किंवा “धोनीने भारतासाठी खूप केले आहे.” असे म्हणून विषय बदलतात. धोनीचे भारतीय क्रिकेटसाठीचे योगदान प्रचंड आहे. मात्र आपण कधी थांबावे हे न कळण्याइतला दूधखुळा तो नक्कीच नाही. या विश्वचषकात तो प्रत्येक सामन्यात आपल्या बॅटवर वेगळा स्टिकर लावून खेळतो आहे. कदाचित यातून तो आपल्या निवृत्तीचे संकेत देतोय की काय अशी शंका वाटते.
असो. धोनी कायमच धक्के देण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे सध्या त्याच्या निवृत्तीची चर्चा असताना विश्वचषक झाल्यावरही तो खेळत राहिला तर शंका वाटायला नको.
वाचा-
…म्हणून धोनी प्रत्येक सामन्यात बदलतोय बॅट
–धोनीने मौन सोडले; निवृत्तीबद्दल केले मोठे भाष्य
–धोनीच्या टीकाकारांना दिग्गज भारतीय फुटबॉलपटू बायचूंग भुतियाने दिले सडेतोड उत्तर






