आयपीएल 2025 चा मेगा लिलाव जवळ आला आहे. लिलावापूर्वी सर्व खेळाडू आपल्या कामगिरीनं संघांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना त्यांच्या संघानं रिलिज केलं. ते आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच एका खेळाडूनं नुकतंच रणजी ट्रॉफीमध्ये त्रिशतक झळकावलं, ज्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दोन आठवड्यांपूर्वीच रिलिज केलं होतं! आता आगामी लिलावात या खेळाडूवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
राजस्थानच्या महिपाल लोमरोरनं उत्तराखंडविरुद्ध रणजी ट्रॉफी सामन्यात ही तुफानी खेळी खेळली. त्यानं केवळ 357 चेंडूत आपलं त्रिशतक पूर्ण केलं. यासह तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणाऱ्या मोजक्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लोमरोर 189 चेंडूत 141 धावांवर नाबाद होता.
लोमरोरनं दुसऱ्या दिवशी उत्तराखंडच्या गोलंदाजांचा कडवा सामना केला आणि 25 चौकार आणि 13 षटकार मारत आपलं त्रिशतक पूर्ण केलं. या 24 वर्षीय फलंदाजाला नुकतंच आरसीबीनं रिलिज केलं आहे. आता त्यानं योग्य वेळी हे त्रिशतक झळकावलं. याचा परिणाम 24-25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मेगा लिलावात निश्चितच होईल.
राजस्थानचा लोमरर 2018 मध्ये पहिल्यांदा आयपीएलचा भाग बनला होता. तेव्हा त्याला राजस्थान रॉयल्सनं संघात समाविष्ट केलं होतं. तो 2022 पर्यंत राजस्थानसोबत होता. त्यानंतर आरसीबीनं त्याला 2022च्या हंगामात आपल्या संघात सामील केलं. आरसीबीसोबत तीन हंगाम खेळल्यानंतर आता त्याला रिलिज करण्यात आलं आहे.
फलंदाजीसह डाव्या हातानं गोलंदाजी करणाऱ्या लोमररनं आतापर्यंत 40 आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 18 च्या सरासरीनं 527 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 140 पेक्षा जास्त होता. आयपीएलमध्ये त्याला आतापर्यंत केवळ एकच अर्धशतक झळकावता आलं आहे. गोलंदाजीत त्यानं फक्त 15 षटकं टाकली, ज्यात त्याला सुमारे 8.5 च्या इकॉनॉमीनं एक विकेट मिळाली आहे.
हेही वाचा –
दोन फलंदाजांनी ठोकलं नाबाद त्रिशतक! रणजी इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी
दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूला मेगा लिलावात 10 कोटी रुपये मिळणार, डेल स्टेनचा अंदाज
मोहम्मद शमी परतला! रणजी ट्रॉफीत जोरदार कामगिरी; टीम इंडियात संधी मिळेल का?