राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू आणि कर्णधार संजू (Rajasthan royals captain Sanju Samson) सॅमसन एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. संजू 2015 पासून राजस्थान रॉयल्सचा भाग आहे, पण आता 11 वर्षांनंतर त्याने संघ सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. पण, प्रश्न असा आहे की फ्रँचायझी त्याला सोडते का? कारण संजू आता राजस्थानसाठी खेळण्याची इच्छा ठेवत नाही.
क्रिकबझच्या माहितीनुसार, संजू सॅमसनच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे की, तो आता राजस्थान रॉयल्समध्ये राहू इच्छित नाही. त्याचे काही जवळचे IPL आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूही याच गोष्टीची पुष्टी करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, संजू आणि फ्रँचायझी यांच्यातील नातेसंबंध काहीसे तणावपूर्ण झाले आहेत.
मात्र संजूचं राजस्थान रॉयल्स सोडणं एवढं सोपं नाही. IPLच्या नियमानुसार, फ्रँचायझी सोडण्याचा निर्णय केवळ खेळाडूच्या इच्छेवर अवलंबून नसतो. एकदा खेळाडूचा करार झाला की तो तीन वर्षांसाठी असतो. अशा वेळी, केवळ फ्रँचायझी आणि खेळाडू दोघांमध्ये परस्पर सहमती झाल्यासच तो करार संपुष्टात आणता येतो.
या सगळ्यामुळे राजस्थान रॉयल्ससाठी एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यांनी असा खेळाडू संघात ठेवावा का जो आता संघात राहू इच्छित नाही? कोणतीही फ्रँचायझी आपल्या संघात समाधानी आणि सकारात्मक वातावरण असलेले खेळाडूच ठेवण्याचा प्रयत्न करते.
IPL 2025मध्ये संजू सॅमसनने दुखापतीमुळे फक्त 9 सामने खेळले, ज्यात त्याने 35.63 च्या सरासरीने 285 धावा केल्या. मात्र, IPL 2024 मध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. त्या मोसमात 16 सामन्यांत 48.27 च्या सरासरीने 531 धावा करत 5 अर्धशतकं झळकावली होती. त्याच्या एकूण IPL कारकिर्दीकडे पाहिलं तर, त्याने 177 सामन्यांत 30.95 च्या सरासरीने 4704 धावा केल्या आहेत.






