क्ले कोर्टचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राफेल नदालने फ्रेंच ओपनचे विक्रमी दहावे विजेतेपद पटकावले. स्वित्झलँडच्या स्टॅन वावरिंकाबरोबर झालेल्या सामन्यात नदालने ६-२, ६-३, ६-१ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवत विजेतेपदाला गवसणी घातली.
२०१४ ला त्याने अखेरचे ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपनच्या रूपानेच जिंकले होते. त्यानंतर या दिग्गज खेळाडूच्या कारकिर्दीत दुखापतीमुळे मोठी उलथापालथ झाली. त्यात यावर्षी जानेवारी महिन्यात रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अंतिम फेरीत नदालला पराभूत केले होते.
४थ्या मानांकित नदालने २ तास चाललेल्या सामन्यात पहिल्या सेटपासूनच वावरिंकावर वर्चस्व गाजवले.
या विजयाबरोबरच एकाच ग्रँडस्लॅममध्ये सर्वाधिक काळ राज्य करण्याचा विक्रम नदालच्या नावावर झाला. नदाल पुरुष किंवा महिला खेळाडूंपैकी एकमेव खेळाडू आहे ज्याने कोणतीही ग्रँडस्लॅम स्पर्धा १० वेळा जिंकली आहे.
तसेच फ्रेंच ओपनमध्ये ७९ विजय आणि फक्त २ पराभव नदालने आजपर्यंत पहिले आहे. त्यात उपांत्यफेरी आणि अंतिम फेरीत नदाल अपराजित आहे. त्यात त्याने २० सामन्यात २० विजय मिळविले आहे.
नदालने संपूर्ण स्पर्धेत एकही सेट गमावलेला नाही. यापूर्वी त्याने २००८ आणि २०१० मध्येच फ्रेंच ओपन एकही सेट न गमावता जिंकली होती.
तसेच या विजयाबरोबर त्याने पिट सम्प्रासचे १४ ग्रँडस्लॅमचे रेकॉर्ड तोडले असून आता नदालच्या नावावर १५ ग्रँडस्लॅम असून त्याच्या पुढे रॉजर फेडरर १८ ग्रँडस्लॅमसह आहे. नदालने आजपर्यंत २२ ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरी खेळल्या असून त्यात त्याच रेकॉर्ड १५-७ असे आहे.
फ्रेंच ओपनच्या इतिहासात पहिल्याच स्पर्धेत फ्रेंच ओपन जिंकणारा नदाल केवळ दुसरा खेळाडू आहे. त्याने हा पराक्रम २००५ साली केला होता जेव्हा तो फक्त १९ वर्षांचा होता.
Games lost by Nadal while winning French Open:
2017: 35
2014: 57
2013: 95
2012: 53
2011: 96
2010: 71
2008: 41
2007: 67
2006: 86
2005: 77— Carl Bialik (@CarlBialik) June 11, 2017