आयपीएल 2021 मध्ये शुक्रवार (16 एप्रिल) रोजी खेळल्या गेलेल्या चेन्नई सुपर किंग विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात सीएसकेचा गोलंदाज दीपक चहरच्या शानदार गोलंदाजीपुढे पंजाब संघाने गुडघे टेकले. वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय उपयोगी ठरला. सीएसकेच्या शानदार गोलंदाजीपुढे पंजाब संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 106 धावा करू शकला.
या सामन्यात शानदार गोलंदाजी करत 4 षटकांत केवळ 13 धावा देऊन 4 गडी बाद करणाऱ्या दीपक चहरला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यानंतरच्या सादरीकरणात त्याने जडेजा आणि धोनीबद्दल मोठे वक्तव्य करून चाहत्यांची मने जिंकली.
या सामन्यानंतरच्या सादरीकरणात आपल्या गोलंदाजीबद्दल आणि धोनीबद्दल बोलताना तो म्हणाला की, “मी नेहमीच डावाची सुरूवात करण्याच्या भूमिकेत राहिलो आहे. जर मी पहिल्या षटकांत वेगवान गोलंदाजी केली किंवा बळी मिळवले, तर आमच्या गोलंदाजीत एक लयबद्धता येते. ही एक मोठी जबाबदारी असून त्यासाठी धोनीने मागील 4 वर्षांपासून माझ्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मला आशा आहे की पुढील काही सामन्यांमध्येही मी अशीच चांगली कामगिरी करू शकेल. गोलंदाज म्हणून मला बळी न मिळाल्यास धावा न देणे हे माझे लक्ष असते. त्यामुळे दुसऱ्या गोलंदाजांना बळी मिळवणे सोपे जाते.”
जडेजाबद्दल बोलताना तो म्हणाला की, “जेव्हा मी मयंक अगरवालचा बळी घेतला तेव्हा मी सर्वाधिक आनंद लुटला असे मला वाटते. स्विंग चेंडू टाकत त्रिफळा उडवणे हे एका गोलंदाजासाठी स्वप्नवतचं असते. पहिल्या षटकात ऋतुराज गायवाडकडे गेलेला झेल हा खूप वेगवान होता आणि तो झेल फक्त जडेजासारखा क्षेत्ररक्षक पकडू शकतो. मी त्यावेळी विचार करत होतो की जडेजा तिथे असायला पाहिजे होता. तो जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असून त्याने माझ्या चेंडूवर बरेच झेल पकडले आहेत. मला मैदानावरील सर्व 11 खेळाडूंमध्ये जडेजाला पाहायचे आहे.”
दरम्यान सामन्याचा विचार करायचा झाल्यास, पंजाब संघाच्या फलंदाजीची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांनी केवळ 57 धावांवर 6 गडी गमावले. यामध्ये फक्त युवा फलंदाज शाहरुख खानच्या खेळीच्या जोरावर पंजाबचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 106 धावा करू शकला. चेन्नईकडून दीपक चहरने शानदार गोलंदाजी करत 4 षटकांत 13 धावा देऊन 4 गडी बाद केले.
तर दुसर्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नई संघातील फाफ डु प्लेसिसच्या 36 आणि मोईन अलीच्या 46 धावांच्या जोरावर 15.4 षटकांत 4 गडी गमावून 107 धावा केल्या. यामध्ये पंजाबकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने 2 गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
आशीर्वाद लाखाचा! सामन्यापुर्वी चाहर शमीच्या पाया पडला अन् मैदान मारलं, पाहा तो नेत्रदिपक क्षण
बलाढ्य चेन्नईचा पंजाबवर एकहाती विजय, कर्णधार राहुलने ‘यांना’ दारुण पराभवास धरले जबाबदार
फुल ऑन एंटरटेनमेंट! लाईव्ह सामन्यात ड्वेन ब्रावोला चढला ‘वाथी फिवर’, व्हिडिओ होतोय व्हायरल