मँचेस्टर युनाइटेड संघाने इंग्लिश प्रीमियर लीगच्या नवीन मोसमाची सुरुवात खूप जबरदस्त केली आहे. या मोसमाच्या पहिल्या सात सामन्यांपैकी त्यांनी सहा सामने जिंकले आहेत तर एक सामना त्यांनी बरोबरीत सोडवला आहे. या सातही सामन्यात युनाइटेडच्या रोमेलू लुकाकूने गोल केले आहेत. सात सामन्यात त्याने सात गोल केले आहेत.
रोमेलू लुकाकूने जरी सुरुवातीच्या सामन्यात चांगली कामगिरी केली असली तरी युनाइटेड संघ त्याला जोडीदार स्ट्रायकर शोधत आहे. त्यांची नजर जुवेन्टस संघाचा नंबर १० म्हणजे पाउलो डिबाला याच्यावर आहे. डिबाला हा अर्जेन्टिनाचा खेळाडू असून त्याच्याकडे लियोनल मेस्सीचा उत्तराधिकारी म्हणून पहिले जाते.
डिबाला सध्या जुवेन्टस संघाचा मुख्य खेळाडू आहे. त्याने मागील वर्षी युएफा चॅम्पियनलीगच्या उपउपांत्यफेरीच्या सामन्यात पहिल्या लेगमध्ये बार्सेलोना संघा विरुद्ध दोन गोल लगावले होते. त्यामुळे जुवेन्टसने आघाडी घेतली आणि बार्सेलोनाला उपउपांत्यफेरीच्या सामन्यात ३-० असे नमवले. या कामगिरी नंतर डिबाला खूप चर्चेत आला.
या समर ट्रान्सफर विंडोमध्ये डिबाला खूप संघाचा मुख्य टार्गेट होता. नेमारने बार्सेलोना संघाला अलविदा केल्यानंतर बार्सेलोना संघ त्याला संघात समाविष्ट करण्यासाठी खूप आतुर होता. परंतु त्याने जुवेन्टस संघा सोबतच राहणे पसंत केले. या मोसमात त्याने जरी जुवेन्टस संघासोबत राहणे पसंत केले असले तरी तो पुढच्या समर ट्रान्सफर विंडोमध्ये संघ सोडेल हे निश्चित आहे. त्यामुळे मँचेस्टर युनाइटेड संघाने त्याच्या सोबत बोलणे सुरु केले आहे. १५५ मिलियन युरो इतकी मोठी किंमत असणारा हा खेळाडू संघात घेण्यासाठी युनाइटेड संघ खूप आतुर आहे.
परंतु अर्जेन्टिनाचा हा खेळाडू पुढील मोसमात बार्सेलोना संघासोबत जोडला जाण्याची जास्त चिन्हे आहेत. बार्सेलोनाचा खेळाडू आणि अर्जेन्टिनाचा कर्णधार मेस्सी याचा डिबाला खूप लाडका खेळाडू आहे. त्यामुळे तो मँचेस्टर युनाइटेड ऐवजी बार्सेलोना संघाशी करार करेल. डिबालासाठी आत्तापासूनच सुरु झालेला हा सामना बार्सेलोना जिंकेल की मँचेस्टर युनाइटेड हे पाहने उत्सुकतेचे होणार आहे.