महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात भारताच्या मानस धामणे याने तर मुलींच्या गटात हरयाणाच्या श्रुती अहलावत या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. तर, दुहेरीत मुलींच्या गटात अस्मी आडकर व वैष्णवी आडकर यांनी विजेतेपद पटकावले आहे.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या अंतिम लढतीत मुलांच्या गटात पाचव्या मानांकित मानस धामणे याने सहाव्या मानांकित आर्यन शहाचा टायब्रेक मध्ये 7-6(4), 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 1तास 40मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले व त्यामुळे सामना टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये मानसने पहिल्याच गेममध्ये आर्यनची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत 5-1 अशी आघडी घेतली. त्यानंतर मानसने आपले वर्चस्व कायम राखत हा सेट 7-6(7-4) असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.
दुसऱ्या सेटमध्ये आर्यनने पहिल्याच गेममध्ये मानसची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत आघाडी मिळवली. पण हि आघाडी त्याला फार काळ टिकवता आली नाही. मानसने चौथ्या व दहाव्या गेममध्ये आर्यनची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-4 असा जिंकून विजेतपद पटकावले. मानस हा बिशप्स शाळेत नववी इयत्तेत शिकत असुन इटली येथे रिकार्डो पियाटी अकादमीत प्रशिक्षक रिकार्डो पियाटी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
मुलींच्या गटात अंतिम सामन्यात भारताच्या दुसऱ्या मानांकित श्रुती अहलावत याने ऑस्ट्रेलियाच्या सहाव्या मानांकित लिली टेलरचा 6-1, 6-4 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. हा सामना 1तास 12मिनिटे चालला. सामन्यात श्रुतीने जोरदार खेळ करत तिसऱ्या गेममध्ये लिलीची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-1 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्येदेखील श्रुतीने लिलीला कमबॅक करण्याची संधी दिली नाही. तिसऱ्याच गेममध्ये श्रुतीने लिलीची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-4असा जिंकून विजय मिळवला. श्रुती ही थायलंडमध्ये स्टीफन कुन यांच्या मार्गर्शनाखाली सराव करते.
दुहेरीत मुलींच्या गटात अंतिम फेरीत अस्मी आडकर व वैष्णवी आडकर या भारतीय जोडीने ऑस्ट्रेलियाच्या लिली फेअरक्लॉ व झारा लार्के यांचा सुपरटायब्रेकमध्ये 4-6, 7-5, 11-9 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. हा सामना 1 तास ४५ मिनिटे चालला. पहिला सेट लिली व झारा या जोडीने अस्मी आडकर व वैष्णवी आडकरविरुद्ध 6-4 असा जिंकून आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये ५-४ अशी स्थिती असताना पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबविण्यात आला. १५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर अस्मी व वैष्णवी यांनी वेगवान खेळ करत हा 7-5 असा जिंकून बरोबरी साधली. सुपरटायब्रेकमध्ये अस्मी व वैष्णवी यांनी सुरेख खेळ करत लिली व झारा विरुद्ध हा सेट 11-9 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेत एकेरी विजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रक आणि 300गुण, तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तीपत्रक व 210गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीएमडीटीएचे सचिव अभिषेक ताम्हाणे, डेक्कन जिमखानाच्या वित्तीय विभागाचे सचिव मिहिर केळकर, डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धा सह संचालक आश्विन गिरमे, आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर, पीएमडीटीएचे हिमांशु गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: एकेरी: (अंतिम फेरी): मुले:
मानस धामणे (भारत) [5] वि.वि.आर्यन शहा(भारत) [6] 7-6(4), 6-4;
मुली:
श्रुती अहलावत (भारत) [2]वि.वि.लिली टेलर(ऑस्ट्रेलिया)[6]6-1, 6-4;
दुहेरी: अंतिम फेरी: मुली:अस्मी आडकर (भारत) /वैष्णवी आडकर(भारत)वि.वि.लिली फेअरक्लॉ (ऑस्ट्रेलिया) /झारा लार्के (ऑस्ट्रेलिया) [3] 4-6, 7-5, 11-9.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘फिनिशींगचे काम डिकेचेच’, कॅप्टन रोहितचा सामन्यानंतर चकीत करणारा खुलासा
वाढदिवस विशेष – क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ
रॉजर फेडररचा इमोशनल बाय-बाय! राफेल नदाल, नोवाक जोकोविच यांना देखील अश्रू अनावर