पोर्तुगाल: भारतीय टेबल टेनिस खेळाडू असलेल्या मानव ठक्करने पोर्तुगाल ज्युनियर व कॅडेट ओपन स्पर्धेमध्ये दोन सुवर्णपदकाची कमाई करत छाप पाडली. यासह भारताच्या टेबल टेनिस चमूने जोरदार कामगिरी करत आठ पदकांची कमाई केली. ज्यामध्ये दोन सुवर्णपदक, दोन रौप्यपदक व चार कांस्यपदकाचा समावेश आहे. मानवने सुरुवातीला मुलांच्या ज्युनियर एकेरी गटात सुवर्णपदक व नंतर मनुष शाहसोबत त्याने मुलांच्या ज्युनियर गटाच्या दुहेरीचे जेतेपद मिळवले.
मुलांच्या ज्युनियर व दुहेरी गटात भारतीय खेळाडू एकमेकांविरुद्ध होते. मानवने एकेरीच्या उपांत्यफेरीत व अंतिम सामन्यात चांगलाच घाम गाळला. उपांत्यफेरीत स्नेहीत सौरवाजुलाने मानवला तगडे आव्हान दिले पण, नंतर 3-4 अशा फरकाने त्याला पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम सामन्यात देखील याच फरकाने जीत चंद्राविरुद्ध मानवने विजय नोंदवला. उपांत्यफेरीत मानवने 11-8. 6-11, 11-7, 11-5, 7-11, 6-11, 11-4 असा विजय मिळवला तर, अंतिम सामन्यात त्याने 11-5, 7-11, 10-12, 11-8, 9-11, 11-4, 11-9 अशा विजयाची नोंद केली.
त्यापुर्वी मानवने राऊंड ऑफ 32 मध्ये चीनच्या मेंगयांग झिओंगविरुद्ध 4-0 असा विजय मिळवत चांगली सुरुवात केली.त्यांने उपांत्यपुर्व व उपांत्यफेरीत अनुक्रमे इटलीच्या जॉन ओयबोडे (4-1) व पोर्तुगालच्या गोन्सालो गोम्स (4-0) यांना नमविले. जीत व स्नेहीत याने मानवला ज्युनियर दुहेरीच्या लढतीत चांगले आव्हान दिले. पण, मानवने मनुषसह 3-2 (11-7, 11-6, 13-15, 7-11, 11-6) असा विजय नोंदवला. जीतने दोन अंतिम सामन्यात रौप्यपदकाची कमाई केली व त्यामधील दुसरे पदक त्याने स्नेहीतसोबत मिळवले.
भारताचे मुलींच्या ज्युनियर एकेरी गटातील आव्हान उपांत्यफेरीतच संपुष्टात आले. सेलेना सेल्वाकुमार व स्वस्तिका घोष यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. सेलेना व स्वस्तिका यांना अनुक्रमे पोर्तुगालच्या यांगझी लिऊ व चीनच्या झिआओस क्युनकडून 0-4 अशा समांतर फरकाने पराभूत व्हावे लागले. सेलेनाला 8-11, 16-18, 8-11, 3-11 असे तर, स्वस्तिकाला 13-11, 11-3, 11-6, 12-10 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.
मुलींच्या ज्युनियर दुहेरी गटात सेलेनाने कांस्यपदक मिळवले. फ्रांसच्या मारी चॅपेटसोबत खेळताना
उपांत्यफेरीत स्पेनच्या राकेल मार्टिन्स व सेलिआ सिल्वा जोडीकडून 0-3 असे पराभूत व्हावे लागले. भारतीय जोडी अनुषा कुटुंबले/मनुश्री पाटील आणि स्वस्तिका घोष/ प्राप्ती सेन यांना अनुक्रमे उपांत्यपुर्व व उप-उपांत्यपुर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.