पुणे: महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए) यांच्या तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस् फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसआरए-76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात जागतिक क्रमवारीत 13व्या स्थानावर असलेल्या भारताच्या जोश्ना चिनप्पा हिने विक्रमी 17वे विजेतेपद पटकावत आजचा दिवस गाजवला. तर, पुरुष गटात महाराष्ट्राच्या महेश माणगावकर याने विजेतेपद संपादन केले.
अमनोरा मॉल ग्लास कोर्ट, आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस् क्लब, मुंढवा, आणि आरएसआय येथील स्क्वॅश कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत महिला गटात अंतिम फेरीच्या लढतीत तामिळनाडूच्या अव्वल मानांकित जोश्ना चिनप्पा हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत तिसऱ्या मानांकित सुनयना कुरुविलाचा 11-5, 11-4, 7-11, 11-5 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. जागतिक क्र. 13 असलेल्या जोश्ना हिने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले. जोश्नाने पहिले दोनही 11-5, 11-4 गेम जिंकून सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर सुनयना हिने कमबॅक करत तिसरा गेम 11-7 असा जिंकून हि आघाडी 2-1 ने कमी केली. पण अनुभवी जोश्ना हिने सुरेख खेळी करत सुनयनाविरुद्ध चौथा गेम 11-5 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. या विजेतेपदाबरोबरच जोश्ना चिनप्पा हिने राष्ट्रीय स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत 17 वेळा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम नोंदविला. याआधी राजस्थानच्या भुवनेश्वरी कुमारी हिने 1977 ते 1992 या कालावधीत 16 वेळा राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकावून विक्रम नोंदविला होता. जोश्नाने हा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम आपल्या नावावर नोंदविला.
विक्रमी विजेतेपद पटकवणारी चिनप्पा यावेळी म्हणाली कि, आज मिळविलेले विजेतेपद हे माझ्यासाठी अनेक अर्थाने विशेष ठरले आहे. कारण या विजेतेपदाबरोबरच मी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे . भुवनेश्वरी कुमारचा विक्रम मोडल्यामुळे मला आता नव्या विक्रमाचे लक्ष्य ठेवणे शक्य होईल. कोणताही विक्रम मोडण्याची खेळाडूंची कामगिरी अभिमानास्पदच असते. अर्थातच आजच्या कामगिरीमुळे माझ्या शिरपेचात एक नवा तुरा खोवला गेला आहे. या विजेतेपदाचे श्रेय मी माझे प्रशिक्षक व पालक यांना देते. आजची सुनयना विरुद्धची अंतिम फेरीची लढत चुरशीची झाली आणि स्पर्धेत सर्व प्रतिस्परध्यांनी अतिशय कसून खेळ केला. त्यामुळेच या स्पर्धेचा दर्जा उच्च होता. म्हणूनच या विजेतेपदाबद्दल मला विशेष आनंद होत आहे.
पुरुष गटात अंतिम फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित महेश माणगावकर याने आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या अभिषेक प्रधानचा 12-10, 11-7, 11-9 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. यावेळी विजेतेपदानंतर आनंद व्यक्त करताना महेश म्हणाला की, संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार प्रतिस्पर्ध्यांवर मात करत या विजेतेपदापर्यँत पोहोचता आले. परंतु या विजेतेपदापेक्षाही अधिक मोठे लक्ष्य मी डोळ्यासमोर ठेवले आहे आणि ते लक्ष साध्य करण्यासाठी माझा प्रयत्न राहील.
प्रो कोच गटात अंतिम फेरीत राजस्थानच्या विकास जांगरा याने महाराष्ट्राच्या अभिनव सिन्हाचा 11-8, 11-5, 11-2 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. पुरुष 35 वर्षावरील गटात अंतिम फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित दिल्लीच्या अमितपाल कोहलीने दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या आदित्य माहेश्वरीचा 11-6, 11-8, 4-11, 11-3 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. 40 वर्षावरील गटात छत्तीसगडच्या अव्वल मानांकित सौरभ नायरने महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित सचिन जाधवचा 11-8, 11-4, 11-9 असा तर, 45वर्षावरील गटात पश्चिम बंगालच्या अव्वल मानांकित दलिप त्रिपाठी याने छत्तीसगडच्या तिसऱ्या मानांकित विकास नायरचा 7-11, 9-11, 12-10,11-8, 11-8 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद मिळवले.
पुरुष 50 वर्षावरील गटात दिल्लीच्या अव्वल मानांकित विवान खुबचंद याने कर्नाटकाच्या सहाव्या मानांकित सौरभ देवकुळीयरचा 7-11, 11-4, 8-11, 11-9, 11-4 असा तर, पुरुष 55 वर्षावरील गटात अंतिम फेरीच्या सामन्यात दिल्लीच्या दृश्यांत जामवालने महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित अंशूण बहलला 11-5, 11-5, 11-4 असे पराभूत करून या गटाचे विजेतेपद मिळवले. 60 वर्षावरील गटात हरियाणाच्या दुसऱ्या मानांकित विजय जैनीने तेलंगणाच्या तिसऱ्या मानांकित रवीकृष्णा बुर्लाचा 11-6, 9-11, 11-3, 11-6 असा, तर 65 वर्षावरील गटात तामिळनाडूच्या अव्वल मानांकित राजीव रेड्डी याने महाराष्ट्राच्या तिसऱ्या मानांकित किशन लालचा 11-6, 11-9, 12-10 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेत एकूण 12 लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला रोलिंग ट्रॉफी व रोख रकमेची पारितोषीक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अभिनेता जॅकी श्रॉफ, स्क्वॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष देवेंद्रनाथ सारंगी, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष डॉ.प्रदीप खांड्रे, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटनेचे सचिव डॉ. ए. दयानंद कुमार, पीएसआरएचे अध्यक्ष कालिदास मगर, सचिव आनंद लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पुरुष गट: अंतिम फेरी:
महेश माणगावकर(महाराष्ट्र)[1]वि.वि. अभिषेक प्रधान(महाराष्ट्र)[2] 12-10, 11-7, 11-9;
महिला गट:अंतिम फेरी:
जोश्ना चिनप्पा(तामिळनाडू)[1]वि.वि.सुनयना कुरुविला(तामिळनाडू)[3]11-5, 11-4, 7-11, 11-5;
प्रो कोच: अंतिम फेरी:
विकास जांगरा(राजस्थान)वि.वि.अभिनव सिन्हा(महाराष्ट्र)11-8, 11-5, 11-2;
पुरुष 35 वर्षावरील गट: अंतिम फेरी:
अमितपाल कोहली(दिल्ली)[1]वि.वि.आदित्य माहेश्वरी(महाराष्ट्र)[2] 11-6, 11-8, 4-11, 11-3;
पुरुष 40 वर्षावरील गट: अंतिम फेरी:
सौरभ नायर(छत्तीसगड)[1]वि.वि.सचिन जाधव(महाराष्ट्र)[4]11-8, 11-4, 11-9;
पुरुष 45वर्षावरील गट: अंतिम फेरी:
दलिप त्रिपाठी(पश्चिम बंगाल)[1]वि.वि.विकास नायर(छत्तीसगड)[3] 7-11, 9-11, 12-10,11-8, 11-8;
पुरुष 50 वर्षावरील गट: अंतिम फेरी:
विवान खुबचंद(दिल्ली)[1]वि.वि.सौरभ देवकुळीयर(कर्नाटक)[6] 7-11, 11-4, 8-11, 11-9, 11-4;
पुरुष 55 वर्षावरील गट: अंतिम फेरी:
दृश्यांत जामवाल(दिल्ली)[2]वि.वि.अंशूण बहल(महाराष्ट्र)[1]11-5, 11-5, 11-4;
पुरुष 60 वर्षावरील गट: अंतिम फेरी:
विजय जैनी(हरियाणा)[2]वि.वि.रवीकृष्णा बुर्ला(तेलंगणा)[3]11-6, 9-11, 11-3, 11-6;
पुरुष 65 वर्षावरील गट: अंतिम फेरी:
राजीव रेड्डी(तामिळनाडू)[1]वि.वि.किशन लाल(महाराष्ट्र)[3] 11-6, 11-9, 12-10 .