भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या अहमदाबाद येथील चौथ्या कसोटी सामन्यात आज शानदार विजय प्राप्त केला. संपूर्ण सामन्यात भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवताना पाहुण्या इंग्लंडला एकदाही डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. तसेच या विजयासह भारताने मालिका देखील ३-१ अशा फरकाने खिशात घातली.
भारताच्या या विजयात सगळ्याच खेळाडूंनी योगदान दिले. विशेषतः पहिल्या डावात फलंदाजीत भारताचे प्रमुख खेळाडू लवकर माघारी परतल्यानंतर युवा रिषभ पंत आणि वाॅशिंग्टन सुंदर यांच्यातील शतकी भागीदारी खऱ्या अर्थाने निर्णायक ठरली. यात रिषभ पंतने तर आपले वैयक्तिक शतक पूर्ण केले, पण दुसऱ्या बाजूने गडी बाद झाल्याने वाॅशिंग्टन सुंदरला मात्र ९६ धावांवर नाबाद राहून परतावे लागले. याचबद्दल भारताच्या एका माजी खेळाडूने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मनोज तिवारीने केले ट्विट
भारताचा माजी फलंदाज मनोज तिवारीने वाॅशिंग्टन सुंदरचे शतक हुकल्याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. अप्रतिम फलंदाजी करून देखील सुंदरला दुसऱ्या बाजूने फलंदाजांची साथ न मिळाल्याने ९६ धावांवर नाबाद राहून माघारी परतावे लागले. त्यामुळे पहिल्या कसोटी शतकाची त्याची प्रतिक्षा कायम राहिली. त्यामुळे नक्कीच तो निराश झाला असेल.
म्हणूनच मनोज तिवारीने ट्विट करत त्याला निराश न होण्याचा सल्ला दिला आहे. मनोज तिवारीने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले, “त्याच्या (वाॅशिंग्टन सुंदर) बद्दल मला अतिशय वाईट वाटते आहे. लाजवाब खेळी, विशेषतः संघाला सर्वाधिक गरज असताना साकारलेली खेळी. निराश होऊ नकोस मित्रा!” अशा शब्दात मनोज तिवारीने वाॅशिंग्टन सुंदरचे मनोधैर्य वाढवले आहे.
Feeling bad for him. Outstanding innings specially when the team needed the most. Don’t be disheartened @Sundarwashi5 😊 God bless u always #WashingtonSundar pic.twitter.com/e77KT8Jddd
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) March 6, 2021
दरम्यान, भारतीय संघासाठी हा विजय अनेकार्थांनी महत्वाचा ठरला. या विजयाने भारतीय संघाने मालिका तर खिशात घातलीच त्याशिवाय आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी धडक मारली. त्याहूनही महत्वाचे म्हणजे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही भारतीय संघाने स्थान मिळवले. आता १८ जूनपासून लॉर्डसच्या मैदानावर होणाऱ्या या अंतिम सामन्यात भारतीय संघ विजेतेपदासाठी न्यूझीलंडशी दोन हात करेल.
महत्वाच्या बातम्या:
अन् विराटने उंचावली ट्रॉफी! पाहा विजयानंतर भारतीय संघाच्या सेलिब्रेशनचा खास व्हिडिओ
दस्तुरखुद्द आनंद महिंद्रांनाही भुरळ पडलेल्या अक्षर पटेलच्या ‘त्या’ गाॅगलची किंमत नक्की आहे तरी किती?
विराट अँड कंपनीची भरारी! इंग्लंडवरील विजयाने जागतिक क्रमवारीत गाठले अव्वल स्थान