फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील दारुण पराभवानंतर भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांची हकालपट्टी करण्यात आली होती. स्टिमॅक यांना 2019 मध्ये भारतीय फुटबॉल संघाचं मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलं होतं. त्यांना 2023 मध्ये एका वर्षाची मुदतवाढही देण्यात आली होती. परंतु एआयएफएफनं कठोर निर्णय घेत स्टिमॅक यांची हकालपट्टी केली.
आता स्पेनच्या मनोलो मार्केझ यांची भारतीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघानं (एआयएफएफ) एक निवेदन जारी करून ही घोषणा केली. मार्केझ सध्या इंडियन सुपर लीग (ISL) मधील एफसी गोवा संघाचे प्रशिक्षक आहेत. ते 2024-25 हंगामात एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत राहतील. भारतीय संघाच्या कोचिंगची पूर्णवेळ भूमिका स्वीकारण्यापूर्वी ते दोन्ही जबाबदारी एकत्र सांभाळतील.
55 वर्षीय मनोलो मार्केझ यांना भारतीय फुटबॉलचं विस्तृत ज्ञान आणि अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रीय संघातील खेळाडूंना, विशेषत: तरुणांना प्रशिक्षण दिलं आहे. मार्केझ 2020 पासून भारतात प्रशिक्षण देत आहेत. त्यांचा पहिला कार्यकाळ हैदराबाद एफसी (2020-23) सोबत होता. त्यानंतर ते एफसी गोवा संघात सामील झाले. मार्केझ यांच्या प्रशिक्षणाखाली हैदराबाद एफसीने 2021-22 हंगामात आयएसएलचं विजेतेपद पटकावलं होतं. याशिवाय मार्केझ यांनी स्पेनमध्येही विस्तृत कोचिंग दिली आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर प्रतिक्रिया देताना मार्केझ म्हणाले, “भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचा प्रशिक्षक होणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या देशाला मी माझं दुसरं घर मानतो. या सुंदर देशात मी पहिल्यांदा आलो तेव्हापासून मी याचा एक भाग बनलो आहे. मला संघाच्या लाखो चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहेत. मी एआयएफएफचा आभारी आहे आणि आशा आहे की आम्ही फुटबॉलसाठी चांगलं काम करू.”
महत्त्वाच्या बातम्या –
एकेकाळी ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर होता भारतीय फुटबॉल संघ! पदक अगदी थोडक्यात हुकलं
पाकिस्तानी खेळाडूनं केलेल्या बाॅल टेम्परिंगच्या आरोपावर, मोहम्मद शमीचे तिखट उत्तर
टी20 विश्वचषक 2026 मध्ये विराट आणि रोहितची जागा कोण घेणार? माजी क्रिकेटपटूने सांगितली 4 नावे