पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय महिला नेमबाज मनू भाकर हिने कमाल केली आहे. अवघ्या 3 दिवसांत तिने नेमबाजीत देशाला 2 पदके मिळवून देत इतिहास रचला आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत ओ ये जिन आणि ली वोंहो या कोरियाच्या जोडीला 16-10 असे पराभूत करून कांस्यपदक जिंकलं. यासह एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय ठरली. यापूर्वी मनूनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकलं होतं.
मनू भाकरच्या या यशामागे तिचे प्रशिक्षक आणि माजी भारतीय नेमबाज जसपाल राणा यांचाही हात आहे. जसपाल राणा यांनी मनूला नेमबाजीच्या प्रशिक्षणाचे धडे दिल्याने ती आज हे यश साध्य करू शकली. आपल्या शिष्याच्या यशाने जसपाल राणा खूप आनंदी आहेत. परंतु एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या मनातील वेदना देखील व्यक्त केल्या आहेत.
जसपाल राणा नोकरीच्या शोधात आहेत
जसपाल राणा यांनी RevSportz ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, “जेव्हा मनू भाकरला टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकही पदक मिळाले नव्हते, तेव्हा मी तिथे उपस्थित नसतानाही माझ्याशी गैरवर्तन करण्यात आले होते, परंतु यावेळी मनूने पदक जिंकल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. खरं तर, मी कोणीही नाही, पण मनूची इच्छा होती की मी तिला मदत करावी. म्हणून मी तिला मदत केली आणि तिने चमत्कार घडवून आणला. मी सर्वांना सांगू इच्छितो की गेल्या तीन वर्षांपासून मला राष्ट्रीय रायफल असोसिएशन किंवा इतर कोणत्याही एजन्सीकडून मासिक वेतन मिळालेले नाही. मी पैसे मिळवण्यासाठी नोकरी शोधात आहे.”
ते पुढे म्हणाले की, “मनूने भारतासाठी पदक जिंकले याचा मला जास्त आनंद आहे. तिच्यात खूप क्षमता आहे आणि मी फक्त तिला योग्य मार्ग दाखवला. मला भारतासाठी पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. मनू स्टार आहे आणि मी बेरोजगार प्रशिक्षक आहे. मी नोकरीच्या शोधात आहे आणि गेली तीन वर्षे माझ्यासाठी खूप कठीण गेली आहेत. मला याबद्दल बोलायचे नव्हते, पण मला भारतासाठी काहीतरी करायचे आहे म्हणून कोणी मला नोकरी देईल का? मी कधीही चुकीचे काही केले नाही. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मी उपस्थित नव्हतो. ज्यांनी मला शिवीगाळ केली आणि मला ट्रोल केले ते लोक मला माझी शांती परत देऊ शकतील, कदाचित कधीच नाही. माझ्या आयुष्यात काय घडणार आहे हे मला माहीत नाही, पण मी भारतात परत येण्यास उत्सुक आहे. मी मनूसोबत राहीन, पण मला नोकरीची गरज आहे. कारण मी गेल्या तीन वर्षांपासून रिकामा आहे त्यामुळे मला त्रास होत आहे,” अशा शब्दांत जसपाल राणा यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे.
हेही वाचा –
इतिहास घडला!! मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीचा कांस्यपदकावर निशाणा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणारी नेमबाजी स्पर्धा कशी खेळली जाते? नियम व अटी काय असतात?
शूटिंगमध्ये भारताच्या पदरी निराशा, पदकाच्या लढतीत 20 वर्षीय रमिता जिंदालचं स्वप्न भंगलं