पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पहिल्या दिवशी (27 जुलै) नेमबाजीतून भारतासाठी चांगली बातमी समोर आली आहे. मनू भाकरनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. मनू भाकर 60 शॉट्सच्या पात्रता फेरीत एकूण 580 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली. भाकरनं पहिल्या सिरिजमध्ये 97, दुसऱ्यामध्ये 97, तिसऱ्यामध्ये 98, चौथ्यामध्ये 96, पाचव्यामध्ये 96 आणि सहाव्या मालिकेत 96 गुण मिळवले. मनू भाकरचा अंतिम सामना उद्या (28 जुलै) भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता होणार आहे.
महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत रिदम सांगवान देखील सहभागी झाली होती, परंतु तिनं निराशा केली. रिदम 573 गुणांसह 15व्या स्थानावर राहिली. 22 वर्षीय मनू भाकर टोकियो ऑलिम्पिकमध्ये विशेष काही करू शकली नव्हती, पण यावेळी तिनं अंतिम फेरी गाठली आहे. ती 10 मीटर एअर पिस्तूल, 25 मीटर पिस्तूल आणि 10 मीटर पिस्तूल मिश्र संघ या तीन स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे.
त्यापूर्वी भारतीय नेमबाज 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पात्रता टप्प्यात बाद झाले होते. या स्पर्धेत दोन भारतीय जोड्या सहभागी झाल्या होत्या. रमिता जिंदाल आणि अर्जुन बाबौता यांनी एकूण 628.7 गुणांसह सहावं, तर इलावेनिल वालारिवन आणि संदीप सिंग यांनी 626.3 गुणांसह 12वं स्थान पटकावले. रमिता आणि अर्जुनच्या जोडीने एकेकाळी आशा निर्माण केली होती. भारतीय जोडी तीन शॉट्स शिल्लक असताना पाचव्या स्थानावर होती, पण शेवटी पदक फेरीसाठी कट ऑफपेक्षा 1.0 गुणांनी मागे पडली.
अर्जुननं दुसऱ्या सिरीजमध्ये चांगली सुरुवात केली आणि 10.5, 10.6, 10.5, 10.9 गुण प्राप्त केले. रमितानं दुसऱ्या सिरीजमध्ये 10.2, 10.7, 10.3, 10.1 गुण मिळवले. यासह ही जोडी अव्वल आठमध्ये पोहोचली. पण अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी एवढे गुण पुरेसे नव्हते. अंतिम फेरी गाठण्यासाठी अव्वल चारमध्ये स्थान मिळवणं आवश्यक होतं. पात्रता फेरीत चीन, कोरिया आणि कझाकस्तानचे संघ पहिल्या तीन स्थानांवर राहिले.
दुसरीकडे, सरबजोत सिंग आणि अर्जुन सिंग चीमा पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत पोहोचू शकले नाहीत. अव्वल आठ नेमबाजांना अंतिम फेरीत स्थान मिळालं. सरबजोतनं पात्रता फेरीत एकूण 577 गुणांसह नववं, तर अर्जुन 574 गुणांसह 18व्या स्थानावर राहिला. आठव्या स्थानासह फायनलमध्ये पोहोचलेल्या जर्मनीच्या रॉबिन वॉल्टरचाही स्कोअर 577 होता, परंतु त्यानं सरबजोतच्या 16 शॉट्सच्या तुलनेत 17 अचूक शॉट्स मारले.
हेही वाचा –
पॅरिसच्या सीन नदीवर फडकला तिरंगा, 2024 ऑलिम्पिक खेळांना धडाक्यात सुरुवात
केएल राहुलचा राऊडी अंदाज! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी उडवलं ‘फायटर प्लेन’; VIDEO व्हायरल
देशाला लवकरच मिळणार गुड न्यूज! भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक जवळपास निश्चित