भारताची 22 वर्षीय नेमबाज मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदकं जिंकून इतिहास रचला आहे. ती एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे.
मनू भाकरच्या या कामगिरीनंतर ती रातोरात स्टार झाली. तिच्यावर सध्या देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांनी मनूचं अभिनंदन केलं आहे. याशिवाय अनेक मोठ्या ब्रँड्सनंही तिचं अभिनंदन केलं आहे. यापैकी अनेक ब्रँड्सनं मनूचा फोटो वापरून तिचं अभिनंदन केलं. मात्र आता असं करणं या ब्रँड्सना महागात पडणार आहे. कारण मनू भाकर अशा ब्रँड्सवर कायदेशीर कारवाई करणार आहे.
बातमी येत आहे की, मनू भाकर दोन मोठ्या ब्रँड्सवर कारवाई करणार आहे. रिपोर्टनुसार, तिनं या ब्रँड्सना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ‘हिंदूस्थान टाईम्स’च्या रिपोर्टनुसार, मनू भाकर एलआयसी (LIC) आणि बजाज या दोन ब्रँड्सवर कायदेशीर कारवाई करणार आहे. या दोन ब्रँड्सनं मनूच्या परवानगीशिवाय तिचा फोटो वापरून अभिनंदनाची जाहिरात बनवली, जे बेकायदेशीर आहे. त्यामुळे मनू त्यांच्यावर कारवाई करणार आहे.
मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी मंगळवारी (30 जुलै) 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत ओ ये जिन आणि ली वोंहो या कोरियाच्या जोडीला पराभूत करून कांस्यपदक जिंकलं. यासह एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय ठरली आहे. तिनं यापूर्वी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकलं होतं. आता मनू भारकचा या ऑलिम्पिकमध्ये आणखी एक इव्हेंट बाकी आहे. या इव्हेंटमध्ये देखील तिच्याकडून पदकाच्या अपेक्षा आहेत.
हेही वाचा –
ऑलिम्पिक गाजवणाऱ्या मनू भाकरचे प्रशिक्षक 3 वर्षांपासून बेरोजगार; म्हणाले, “मला माझा मासिक पगारही…”
मनू भाकरनं जे केलं, ते कोणताच भारतीय करू शकला नाही! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घडला इतिहास
वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी शूटींगला सुरुवात; कोण आहे मनू भाकरसोबत कांस्यपदक जिंकणारा सरबज्योत सिंग?